#व्हिडियो : विहिरीत पडलेला बिबट्या अखेर जेरबंद

पाच तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागास यश

उंब्रज – खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत पट्टी नावाच्या शिवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला सुरक्षित बाहेर काढण्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले. विहिरीत लोखंडी कॉटचा पाळणा करून बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात आले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत पट्टी नावाच्या शिवारात संजय तुकाराम शिंदे यांची विहीर असून गावातील पांडुरंग शिवाजी गाडे हे आज (गुरुवारी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणी पाजण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी पांडुरंग गाडे यांनी मोटर सुरू करण्यापूर्वी विहीरीत किती पाणी आहे, हे पाहण्यासाठी विहीरीत डोकावून पाहिले असता त्यांना फुटबॉलच्या प्लास्टिक पाईपला बिबट्या घट्ट धरुन बसल्याचे दिसले. घटनेचे गांभीर्य ओळखून गाडे यांनी तातडीने सरपंच अमर माने यांच्याशी संपर्क साधून बिबट्याची माहिती दिली. माने यांनी टोल फ्री नंबर वरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

 

थोड्याच वेळात कराडचे वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वराडे वनपाल रमेश कुंभार, एस. जी. सुतार, वनरक्षक भारत खटावकर, अशोक मलप, सुजित गवते, सागर कुंभार, तानाजी मोहिते, प्रशांत मोहिते, बाबूराव कदम, योगेश पाटील, संदीप कुंभार, विलास वाघमारे, रामदास घावटे, दादाराव बर्गे, जाधव, सौरभ लाड, शंभूराज माने, मोहन भांडलकेर, दिनकर इंगळे व इतर वन कर्मचारी, ग्रामस्थ हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी रेस्कू ऑपरेशन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, खालकरवाडीसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच त्यांनी रेस्कू ऑपरेशन करण्यास प्रारंभ केला. त्यांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने लोखंडी कॉट विहीरीमध्ये सोडली.

बिबट्याने कॉटचा अंदाज घेत त्यावर काही वेळाने विसावा घेतला. त्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वनविभागाने मागवण्यात आलेला पिंजरा विहीरीच्या काठावर दाखल होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजरा विहीरीत सोडण्यात आला आणि कॉटवर विसावलेल्या बिबट्याने पिंजऱ्यात उडी मारताच पिंजऱ्याचे दार लावण्यात आले. बिबट्या अलगदपणे पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

बिबट्याला सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद केले असून त्याला वन अधिवासात सोडणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याची बछडी नर-मादीपासून सात ते आठ महिन्यापासून एकटी वावरण्यास सुरुवात करतात. तसेच स्वत:ची उपजीविका स्वत: करतात. हा बिबट्याचा बछडा एक वर्षीय असून तो रात्रीच्या अंधारात भक्ष्याच्या शोधात पाण्याच्या विहिरीत पडला असावा, असे वनक्षेत्रपाल अजित साजणे यांनी सांगितले. बिबट्याला सुरक्षित पकडल्यानंतर त्याची पशुवैद्यकीय अधिकारी भोसले यांनी तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल्याचे सांगितले.

घटनास्थळी गर्दी

घटनास्थळी सकाळी सात वाजल्यापासून खालकरवाडीसह परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. चाफळकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुक कोंडी व घटनास्थळी रेस्क्‍यू टीमला अडथळा होऊ नये, म्हणून उंब्रज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी गणेश बाखले, हेमंत कुलकर्णी, अभय भोसले, शिवाजी गुरव, राजेंद्र महाडीक हे पोलिस कर्मचारी याठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)