“व्हायरल फ्लू’ने उद्योगनगरी फणफणली

पिंपरी – सध्या पडत असलेले कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती, पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये व्हायरल फ्लूने डोके वर काढले आहे. थंडी, ताप, खोकला, थकव्याने रुग्ण बेजार झाले असल्याने शहरात महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. मागील महिनाभरात तब्बल 1134 जण व्हायरल फ्लूने फणफणले.

दिवसभर कडक ऊन, ढगाळ वातावरण, अचानक पडणाऱ्या पावसामुळे कधी उष्णता, तर कधी हवेतील गारवा असे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी थंडी, ताप, खोकला आदी आजार वाढू लागले आहेत. डॉक्‍टरांकडे जाण्याऐवजी ते आजार अंगावर काढणे, योग्य ती काळजी न घेणे, पोषक आहार नसणे, वेळीच योग्य ती दक्षता न घेतल्याने आजाराचे प्रमाण गंभीर होत आहे. परिणामी टायफॉईड, स्वाइन फ्लू व डेंगी, कावीळ यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

-Ads-

शहरातील महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. पावसाळ्यात मच्छरांमुळे डेंग्यूची लागणही अनेक ठिकाणी झाली आहे. मध्यंतरी जोरदार पाऊस पडून गेल्याने नदी, विहिरी आणि तळ्यांमधील पाणी गढूळ झाले आहे. त्यातच जलस्रोतांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केल्याने ठिकठिकाणी दूषित पाणी झाले आहे. या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अतिसार, हगवण, कावीळ व हिवतापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे चित्र रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे.

अंगदुखी बरोबरच सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी दवाखाने रुग्णालयांमध्ये गर्दी करु लागले आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंग मोडून पडणं, अनुत्साही वाटणं, डोकं दुखणं अशा तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात येत आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासून व्हायरल फ्लूच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली. महापालिकेच्या 26 दवाखाने व रुग्णालयात जून महिन्याच 334, जुलैमध्ये 491 तर ऑगस्ट महिन्यात व्हायरल फ्लू झालेल्या 843 रुग्णांवर उपचार करण्यात आले. सप्टेंबरमध्ये यामध्ये लक्षणीय वाढ झाली. तब्बल 1134 जणांना व्हायरल फ्लूची लागण झाली. विषाणू आणि कीटक यांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाल्याने आरोग्य धोक्‍यात आले असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

परतीकडे निघालेल्या पावसामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. परिणामी व्हायरल फ्लूचे प्रमाण वाढले आहे. आजार नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची गरज आहे. पाणी उकळून प्यावे किंवा फिल्टर असल्यास अधिकच चांगले. उघड्यावरील आहार, पदार्थ खाऊ नयेत. सामान्य फ्लू बरोबरच स्वाईन फ्लूच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दवाखान्यात जाण्याऐवजी आजार अंगावर काढणे, योग्य ती काळजी न घेणे, पोषक आहार नसणे, वेळीच योग्य ती दक्षता न घेणे यामुळे आजार फैलावण्याची भिती अधिक असते त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
– डॉ. शंकर जाधव, उपअधिक्षक, वायसीएम रुग्णालय, महापालिका.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)