“व्हाईट कॉलर’ नेतृत्वाची काळी बाजू

पिंपरी-चिंचवड कामगारनगरीतून

निशा पिसे
—————
पिंपरी-चिंचवड शहर ही कामगारनगरी. येथील कामगार चळवळींनी अनेक कामगार नेते घडवले. कामगारांमधूनच हे नेतृत्व उभे रहायचे. मात्र, मागील काही वर्षात स्वयंघोषित कामगार नेत्यांचा उदय झाला आहे. “बाऊन्सर’च्या गराड्यात, वातानुकूलित वाहनांमधून फिरणाऱ्या हे कामगार नेते आणि कामगार यांच्यात संवादाची मोठी दरी निर्माण झाली आहे. कामगार कायद्याचा धाक दाखवून कारखानदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांची औद्योगिक परिसरात चलती आहे. कारखान्याचे स्थलांतरण, उत्पादनाचे “आऊट सोर्सिंग’, साहित्य पुरवठ्याचे कंत्राट यापासून ते “आयटूआर’पर्यंत सारेकाही हे तथाकथित कामगार नेते हाताळत आहेत. व्यवस्थापनाशी हातमिळवणी करुन त्यांना अनुकूल असा वेतनकरार करुन ही मंडळी स्वतःच्या तुंबड्या भरत आहेत. या “व्हाईट कॉलर’ कामगार नेत्यांमुळे शहरातील कामगार चळवळ दिशाहीन झाली आहे.
—-
एच. ए. च्या उभारणीनंतर पिंपरी-चिंचवड कामगारनगरीची पायाभरणी झाली. उद्योगांच्या उभारणीनंतर हळूहळू कामगार संघटनांनी हात-पाय पसरवण्यास सुरुवात केली. त्यावेळी कामगारांमधूनच कामगार नेतृत्व निवडले जायचे. त्यातून अनेक कामगारांना नेतृत्वाची संधी मिळाली. न्याय, हक्कांपासून ते वेतनवाढीपर्यंत प्रत्येक बाबींमध्ये कामगार संघटनेला आणि पर्यायाने कामगारांना विश्‍वासात घेतल्याखेरीज कोणताही निर्णय घेण्यास व्यवस्थापन धजावत नव्हते. कामगारांच्या एकीचा दबदबा असायचा. गरवारे नायलॉन, बजाज ऑटो सारखे अनेक संयमी लढे कामगार नेतृत्वातून लढले गेले. मात्र, मागील दहा वर्षांपासून आयात नेतृत्वाचा कामगार चळवळीमध्ये शिरकाव झाला. तेव्हापासून शहरातील कामगार चळवळ भरकटत चालली आहे. सध्याच्या “व्हाईट कॉलर’ कामगार नेत्यांचे “उद्योग’ पाहता कामगार नेता ही व्याख्याच बदलण्याची वेळ आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामगार संघटना म्हणजे बिनभांडवली धंदा असे मानून बाह्य व्यक्तींनी कामगार नेता म्हणून कामगार चळवळीत शिरकाव केला. त्यातून एकाच कारखान्यात दोन-दोन कामगार संघटना स्थापन झाल्या. कायदेशीर आणि कामगार मान्यता संघटनेच्या वादातून “कोर्ट-कचेऱ्या’ झाल्या. यामध्ये कामगारांचे वर्षानुवर्षे वेतन रखडल्याचे फोर्स मोटर्सच्या आंदोलनातून पहायला मिळाले. कधीही कामगार म्हणून घाम न गाळलेल्यांच्या हाती अनेक कारखान्यांमधील कामगारांचे नेतृत्व गेले आहे. वेतनवाढ करार या एकाच मुद्यावर हे “व्हाईट कॉलर’ कामगार नेता काम करत आहेत. त्यामुळे कामगार क्षेत्रात व्यक्तिवादाचा उदय झाला आहे. वातानुकूलित कार्यालयातून हे तथाकथित कामगार नेते संघटनेचा कारभार हाकतात. सुरक्षा रक्षक तसेच “भाऊ’, “दादा’, “भाई’ करत मागे-पुढे फिरणाऱ्या बेरोजगार युवकांचा फौजफाटा यांच्या दिमतीला असतो.

कामगारांची एकी फोडून काढण्यासाठी अंतर्गत कामगार संघटना असताना बाहेरील कामगार नेत्यांच्या नेतृत्ववाढीला कारखानदारांकडून खतपाणी घातले गेले. मात्र, आता हेच “व्हाईट कॉलर’ कामगार नेते कारखानदारांसाठी डोकेदुखी ठरु लागले आहेत. कारखाना बंद करायचा असो, कारखान्यातील उत्पादन स्थलांतरीत करायचे असो अथवा कामाचे “आऊट सोर्सिंग’ असो सर्वत्र या कामगार नेत्यांची लुडबूड वाढत चालली आहे. गुंडागर्दी, राडा हे कामगार आंदोलनाचे स्वरुप होत चालले आहे. मार्केटमध्ये कारखान्याची प्रतिमा खराब होवू नये यासाठी हे सहन करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय कारखानदारांपुढे उरलेला नाही. औद्योगिक परिसरातील भूखंड विक्री, बंद पडलेल्या कारखान्यांची जागा विक्री, औद्योगिक भूखंडाचे निवासीकरण (आयटूआर) या कामगार नेत्यांच्या हस्तक्षेपाखेरीज पार पडत नाही. कामगारांना सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यापासून ते कॅन्टीनच्या कंत्राटापर्यंत सारेकाही या तथाकथित कामगार मंडळींनी स्वतःच्या खिशात घातले आहे. भोसरी, चाकण, रांजणगाव परिसरातील अनेक कारखान्यांमध्ये एका आमदाराची वाढती दहशत चर्चेचा विषय ठरला आहे. “व्हाईट कॉलर’ कामगार नेत्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून अनेक उद्योगांनी काढता पाय घेण्याचे धोरण अवलंबले आहे. यामध्ये सामान्य कामगारांचे मरण होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)