व्यावसायिक तरुणाला मारहाण ; दोघे गजाआड

चिंचवड – दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तरुणाला दमदाटी व मारहाण करत त्याच्याकडील 50 हजार रूपये किंमतीची दुचाकी पळवून नेणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. त्यांचा एक साथीदार पसार आहे. हा प्रकार सोमवारी रात्री दहाच्या सुमारास चिंचवड – शाहुनगर येथील युरो किडस्‌ प्री स्कूलसमोर घडला.

नरेश सुनील घनवट (वय-25, रा. आझाद चौक, निगडी), विशाल संजय कराटे (वय-28, ओटा स्किम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांचा साथीदार संतोष भालेराव हा पसार आहे. अभिजीत यादव (वय-24, रा. चिंचवड) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फौजदार आर. बी. बांबळे यांनी माहिती दिली. आरोपी नरेश घनवट हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत.

फिर्यादी अभिजीतचा हिंजवडीत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री दहा वाजता तो शाहूनगरहून निगडीकडे पॅशन प्रो दुचाकीने जात होता. पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरील त्रिकुटाने अभिजीतला दमदाटी करत हाताने मारहाण केली. त्याची 50 हजार रूपये किंमतीची दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली. एमआयडीसी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)