व्यावसायिकांचा रस्ता, पार्किंगवर ताबा

पार्किंगसाठीची जागा ताब्यात, अतिक्रमण विभाग मेहेरबान

पुणे – शहराच्या मध्यभागातील अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे नागरिकांना वाहने उभी करण्यास मर्यादा येत आहेत. यातच दुकानांसमोर गाड्या लागू नयेत, म्हणून बहूतांश हॉटेल, दुकानांसमोर मोठमोठ्या लोखंडी जाळ्या, सिमेंटचे ब्लॉक टाकले आहेत. अशा प्रकारे पार्किंगच्या जागेवरच दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने गाडी लावण्यास जागा मिळत नाही. परिणामी नाईलाजास्तव इतरत्र वाहने लावली जातात. मात्र, वाहनांवर महापालिका कायद्यानुसार हजारो रुपयांचा दंड लावून नागरिकांचा खिसा रिकामा केला जातो. परंतु बेशिस्त हॉटेल, दुकानांवर कारवाई होत नसल्याने अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात आहे.

शहरातील मध्यवर्ती भागांतील अनेक रस्ते देखभाल दुरुस्ती आणि फुटपाथ वाढवल्यामुळे अरुंद झाले आहेत. यातच मंडई परिसर, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, अप्पा बळवंत चौक, कुमठेकर रोड आदी रस्त्यांवर गाडी उभी करण्यास जागा मिळणेही अवघड झाले आहे. यातच दुकानात येण्यासाठी पुरेशी जागा असावी, या उद्देशाने बहूतांश दुकानदारांनी समोर ब्लॉक, लोखंडी जाळ्या, स्टूल टाकून ठेवले आहेत. यामुळे अगोदरच कमी असलेली पार्किंग जागा अधिकच कमी पडत असून याचा तोटा सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. पार्किंगच्या ठिकाणी जागा न मिळाल्याने इतरत्र वाहने लावली जातात. मात्र, अशा वाहनांवर महापालिका कायद्याचा वापर करून कारवाई केली जाते. यामुळे लागणारा दंड हजार, दोन हजार रुपये आहे. एकूणच दुकानदारांच्या चुकीचा तोटा सर्वसान्यांना सहन करावा लागत असल्याची स्थिती शहरातील मध्यवर्ती भागात दिसून येत आहे. अप्पा बळवंत चौक आणि मंडई परिसरातील अनेक हॉटेलचालक, दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर मोठमोठ्या जाळ्या लावून ठेवल्याने नागरिकांना पार्किंगसाठी जागा पूरत नाही. परिणामी इतरत्र वाहने लावावी लागत असून यामुळे कोंडीतही भर पडल्याचे दिसून येते. दरम्यान, यासंदर्भात अतिक्रण विभागाशी संपर्क साधला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.

महापालिका अॅक्‍ट, नागरिक कंगाल
शहरातील विविध भागांत बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियमभंग केल्यास आता महापालिका अॅक्‍टनुसार हजारो रुपयांचा दंड लावण्यात येत आहे. मात्र, शहरातील अप्पा बळवंत चौक, मंडई यासारख्या भागांत पार्किंगसाठीची जागा अपुरी पडत असून आहे त्या जागेवर दुकानदार ताबा मिळवत आहेत. तसेच, या परिसरातील वाहनतळे अपुरे पडत असून जागा न मिळाल्याने इतरत्र वाहने लावावी लागतात. मात्र, अशा वाहनांना जॅमर लावून हजारो रुपयांचा दंड लावण्यात येत असून नागरिकांना कंगाल बनवण्याचे काम सुरू आहे.

नो व्हायलोशन झोन कुठय?
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध शंभर चौकांमध्ये नो ट्रॅफिक रुल व्हायलोशन झोन राबवण्यात आले. महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे या ठिकाणावरील बेशिस्त वाहनांवर तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, दसऱ्यांच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही मोहीम दिवाळीच्या अगोदरच थंडावली आहे. यामुळेच मंडईसारख्या परिसरात सर्व परिस्थिती उघड्या डोळ्याने दिसत असतानाही कारवाई केली जात नाही. यामुळे नो व्हायलोशन झोन मोहीम शांत झाल्याचे बोलले जात आहे.

मंडई तसेच आसपासच्या परिसरात अशा प्रकारे ब्लॉक टाकून पार्किग कमी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कारवाईत दुकानांसमोरील लोखंडी जाळ्या उचलण्यात आल्या होत्या. मात्र, काही जणांकडून वारंवार जाळ्या टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून महापालिकेच्या मदतीने कारवाई केली जाईल.
– सूरज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)