व्यापाऱ्याच्या मुलाचे 20 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण

व्यापाऱ्याच्या मुलाचे 20 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण
खडक पोलीस व गुन्हे शाखेने तातडीने कार्यवाही करत केली सुखरुप सुटका

पुणे,दि.7- टिंबर मार्केट परिसरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून पसार झालेल्या चौघांना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी मुलाला दिवसभर बंद टेम्पोमधून फिरवले होते. अपहरण करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या एका गुंड सामील असल्याचे उघडकीस आले आहे.

-Ads-

या प्रकरणी खडक पोलिसांनी सूरज लक्ष्मण चव्हाण (25 , रा. कुंभारवाडा, सातारा), अरबाज फिरोज खान (27, रा. चुडामण तालीमीनजीक, भवानी पेठ), फरदीन परवेझ खान (19 ,रा. कोंढवा खुर्द), साहील अब्दुल शेख (23 , मीठानगर, कोंढवा) यांना अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार शाहबाज खान आणि सुयश वाघमारे पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी व्यापारी महेंद्र ओंकारमल निफजिया(57, रा.भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यापाऱ्याचे टिंबर मार्केट परिसरात बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्यांचा 29 वर्षीय मुलगा दुचाकीवरून कामानिमित्त निघाला होता. त्यावेळी आरोपींना त्याला रस्त्यात अडवले. यानंतर त्याला जबरदस्तीने टेम्पोत घातले. तेथून ते घेऊन आरोपी पसार झाले. दरम्यान, किरकोळ कामासाठी बाहेर पडलेला मुलगा दुकानात न परतल्याने व्यापाऱ्याने मुलाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास व्यापाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावर मुलाने संपर्क साधला. त्यावेळी घराबाहेर शाहबाज खान आणि सुयश वाघमारे थांबले असल्याचे सांगितले. त्यांनी तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून सुटकेसाठी वीस कोटी रूपये द्यावे लागतील असे सांगितले. यानंतर ते दोघे व्यापाऱ्याला धमकावून तेथून गेले.
शाहबाजचे वडील व्यापाऱ्याच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्याने त्याच्या वडिलांशीही संपर्क साधला होता. मात्र मुलाचा कोणताच ठाव ठिकाणा लागला नाही. दरम्यान त्यानंतर व्यापाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आरोपींनी धमकाविण्यास सुरूवात केली. घाबरलेल्या व्यापाऱ्याने तातडीने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या युनिट एककडून समांतर तपास करण्यात येत होता.तडजोडीत आरोपींनी पंधरा लाख रूपये देण्याची मागणी करण्यात आली होती.
… असे सापडले जाळ्यात
पोलिसांना खबर लागली असावी या भितीने आरोपींनी व्यापाऱ्याला रोकड घेऊन शहराच्या वेगवेगळ्या भागात बोलाविले. दरम्यान मध्यरात्री व्यापाऱ्याला कोंढवा भागात रोकड घेऊन बोलाविले गेले. आरोपींनी व्यापाऱ्याच्या मुलाला दिवसभर टेम्पोतच डांबून ठेवले होते. सूरज चव्हाण कोंढव्यात पैसे घेण्यासाठी आला. तेथे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक निरीक्षक पवार, पाटील आणि पथकाने सापळा लावला होता. चव्हाणला ताब्यात घेण्यात आले. आरोपी चव्हाणच्या साथीदारांना याची कुणकुण लागताच ते टेम्पोतून कात्रजच्या दिशेने पसार झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम आणि पथकाने टेम्पोचा पाठलागा केला. पोलिसांनी टेम्पो थांबविण्याची सूचना दिल्यानंतर आरोपींनी टेम्पो थांबविला नाही. पोलिसांनी उर्वरित तीन आरोपींना पकडले आणि त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आरोपी शाहबाज, अरबाज, सुयश सराईत आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरबाजला पोलिसांनी हद्दपार केले होते. व्यापारी आरोपींना ओळखत होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)