व्यापारासंबंधित व्यवहारांसाठी पोर्टल येणार – सुरेश प्रभू

  नव्या औद्योगिक धोरणामुळे परदेशी गुंतवणूक वाढणार

मुंबई  -केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबईत 2016-17 वर्षासाठी रसायने निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे (सीएचईएमईएक्‍ससीआयएल) दिले जाणारे निर्यात पुरस्कार आणि प्रमाणपत्रे प्रदान केली. कंपन्यांच्या उल्लेखनीय निर्यात कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. गेल्या तीन वर्षातील निर्यातीतील सातत्य आणि वाढ लक्षात घेऊन पुरस्कारांसाठी निवड केली जाते. 2016-17 वर्षासाठी एकूण 73 पुरस्कार देण्यात आले, यात दोघांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

उत्पादनावर लादण्यात आलेल्या अनेक कठोर अटींमुळे अनेक विकसित देशांमध्ये रसायनांची निर्मिती करणे कठीण बनले आहे. या परिस्थितीचा लाभ घेऊन जागतिक बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज करण्याची संधी असल्याचे प्रभू म्हणाले. निर्यात परिषदेने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे आखायला हवीत, असे ते म्हणाले.रसायन उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले.

पुढील 7-8 वर्षात भारत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगांनी नवीन बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्याबाबत विचार करायला हवा. निर्यात प्रोत्साहन योजना राबवण्यासाठी सरकार आवश्‍यक ती मदत करेल असे आश्वासन प्रभू यांनी दिले.परराष्ट्र व्यापाराशी संबंधित सर्व व्यवहारांसाठी एक पोर्टल तयार करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. यामुळे व्यापार संबंधित सर्व समस्यांचे सरकारला प्रभावीपणे निराकरण करता येईल, असे ते म्हणाले. नवीन औद्योगिक धोरण विचाराधीन असून त्याला लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नवीन धोरणामुळे औद्योगिक क्षेत्रात नवी गुंतवणूक येईल आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील निर्मितीचा वाटा वाढेल, असे ते म्हणाले. हे धोरण अधिक सर्वसमावेशक व्हावे या करिता उद्योजक आणि उद्योजकांच्या संघटनाकडून मते मागविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)