जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य पदही घेतले काढून
वाई, (प्रतिनिधी) – घरपट्टी थकबाकीच्या कारणावरून व्याजवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेश्‍मा शरद पिसाळ यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नुकताच दिला. त्यामुळे व्याजवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य दीपक पिसाळ यांनी 2 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. रेश्‍मा पिसाळ या ऑगस्ट 2015 ते 2020 या कालावधीसाठी सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची एकत्र कुटुंबाची मिळकत नं. 71 याचा अनुक्रमांक 72 असून या मिळकतीची 2016 – 2017 या वर्षाची घरपट्टी व इतर कराची अशी एकूण 945 रुपये घरपट्टी व इतर कराची अशी एकूण 945 रुपये रक्कम भरण्याची मागणी ग्रामपंचायतीने 8 ऑगस्ट 16 रोजी रेश्‍मा पिसाळ यांच्याकडे केली होती. सदर नोटीस प्राप्त होवूनही नियमानुसार 15 दिवस व 90 दिवस झाल्यानंतरही सदर घरपट्टीचा भरणा न केल्याने त्या थकीत झाल्या होत्या. त्यामुळे त्या सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे तक्रारीत दीपक पिसाळ यांनी नमूद केले होते. याबाबत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार दीपक पिसाळ यांचा विवाद अर्ज मान्य करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 खंड (ह) व कलम 16 अन्वये रेश्‍मा पिसाळ यांना उर्वरित कालावधीसाठी सदस्यपदावरून अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. या घटनेमुळे व्याजवाडीत मोठी खळबळ उडाली असून सरपंच घरपट्टी भरण्याबाबत चाल ढकल करत असेल तर ग्रामस्थांनी घरपट्टी कशी भरावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, रेश्‍मा पिसाळ यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिल दाखल केले असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)