व्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर 

जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी : वाहतुकीचा खर्च घटणार 

रुपयाच्या मूल्यात वाढ झाल्यामुळे तूटही कमी पातळीवर राहणार 

नयी दिल्ली: सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्‍टोबरअखेर किरकोळ किमती आधारित ग्राहक किंमत निर्देशांक 3.31 टक्के पातळीवर नोंदविण्यात आला. सप्टेंबरमधील 3.7 टक्‍क्‍यांच्या तुलनेत त्यात घसरण झाली. शिवाय ऑक्‍टोबर 2017 मधील 3.58 टक्‍क्‍यांच्या स्तरापेक्षा तो कमी नोंदविला गेला. नंतर आज बुधवारी घाऊक महागाईचा दर जाहीर केला गेला आहे. तो थोडा वाढला असला तरी 5 टक्‍क्‍यांच्या जवळच आहे. यामुळे या वर्षाच्या उरलेल्या काळात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता कमी असल्याचे आता विश्‍लेषण करणाऱ्या संस्थांना वाटू लागले आहे. त्यातल्या त्या समाधानाची बाब म्हणजे क्रुडचे दर आता बरेच कमी झाल्यामुळे भारताच्या अनेक प्रश्‍नांची तीव्रता कमी होणार आहे. रुपयाच्या मूल्यात वाढ होत असल्यामुळे चालू खात्यावरील तूट कमी होण्याची शक्‍यता आहे.

व्याजदर निर्धारणासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात किरकोळ महागाई दराची पातळीच लक्षात घेतली जाते. ती संपूर्ण अर्ध वर्षांत समाधानकारक पातळीवरच राहिली असून, ऑक्‍टोबरमध्ये तर तिने वर्षांतील नीचांकाला वळण घेतले. यातून रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण निर्धारण समिती अर्थात एमपीसीने रेपो दराशी छेडछाड करण्याची शक्‍यता संपुष्टात आली आहे. किंबहुना मार्च 2019 पर्यंत तरी व्याजदरात वाढीची कोणतीही शक्‍यता दिसून येत नाही, असा कोटक सिक्‍युरिटीजच्या संशोधन अहवालाचा कयास आहे.

आगामी काही महिन्यांत किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर 2.8 टक्‍के ते 4.3 टक्‍क्‍यांदरम्यान म्हणजे रिझर्व्ह बॅंकेच्या दृष्टीने सुसह्य पातळीवर राहण्याची शक्‍यता या अहवालाने व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने ऑक्‍टोबरमधील पतधोरणाच्या द्विमासिक आढावा बैठकीत, व्याजाचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर त्याआधीच्या सलग दोन पतधोरण बैठकांमध्ये रेपो दरात प्रत्येकी पाव टक्‍क्‍यांची वाढ करीत तो मध्यवर्ती बॅंकेने 6.5 टक्‍क्‍यांच्या पातळीवर आणला आहे.

कृषी उत्पादनांना वाढवून दिलेला किमान हमीभाव, खनिज तेलाच्या किमतीचे विपरीत वळण, रुपयाची डॉलरच्या तुलनेत अशक्‍तता, तर वेतन आयोगानुसार राज्यांकडून घरभाडे भत्त्यात वाढीची अंमलबजावणी यांचा महागाई दरावरील परिणाम अद्याप स्पष्ट व्हायचे आहेत. त्यावर लक्ष ठेवावे लागेल, असेही या अहवालाचे निरीक्षण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)