चिखलीत व्यसनमुक्ती दिनानिमित्त फेरी

चिखली  – कोणत्याही प्रकारची नशा करण्याचे व्यसन मनुष्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उद्धवस्त करते. प्रत्येकाने व्यसनांपासून स्वतःस दूर ठेवावे, असे आवाहन प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चिखली शाखेच्या वतीने करण्यात आले. यासाठी चिखली शाखेच्या वतीने व्यसनमुक्ती जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक तंबाकू विरोधी दिनाचे औचित्य साधत प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चिखली शाखेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्‍तीसाठी जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीमध्ये जनजागृतीसाठी विशिष्ट प्रकारची वेशभूषा परिधान करुन व्यसनांच्या परिणामांविषयी नागरिकांना जागृत करण्यात आले.

यावेळी नगरसेविका साधना अंकुश मळेकर तसेच चिखलीतील उद्योजक अंकुश मळेकर, ब्रह्माकुमारी संगीता बहन यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. चिखली परिसरात सदर फेरी काढून व्यसनाचे दुष्परिणाम सांगून प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहावे अशी जागृती करण्यात आली. यावेळी व्यसनाची नशा करी, आयुष्याची दुर्दशा, मादक द्रव्याची गोळी करी जीवनाची होळी, तंबाखूची साथ तर आयुष्य बरबाद, व्यसनमुक्ती सुखी जीवनाची सुरुवात अशा घोषवाक्‍यांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी रामदासनगर, पाटील नगर, गावठाण परिसर , चिंतामणनगर, संत कृपानगर या भागातून फेरी काढण्यात आली. सदर फेरीत माहिती पत्रके वाटून जागृती करण्यात आली. चिखली परिसरातील नागरिकांनी या फेरीचे कौतुक केले. तसेच नागरीक देखील व्यसनमुक्‍तीच्या अभियानामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)