व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटूंब उद्‌ध्वस्त

अजित पवार : बारामती येथील महाआरोग्य शिबिराला जत्रेचे स्वरुप
बारामती  – व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटूंब उद्‌ध्वस्त होत आहेत. त्यामुळे तरुणांनी व्यसनात गुरफटू नये. आरोग्य महत्त्वाचे असून प्रत्येकाने स्वत:चे आरोग्य जपण्याची गरज आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केले.
बारामती येथे महिला शासकीय रुग्णालयात जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बारामती नगरपरिषद तसेच जिल्हा परिषेद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, सभापती प्रवीण माने, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, बारामती शहरात होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सत्ता नसल्याने संथ गतीने सुरू आहे. कम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्वोत्तम महाविद्यालय असेल. महाविद्यालयाच्या बाजूलाच हेलिकॅप्टर उतरवण्याची सोय करण्यात येईल. त्यामुळे आरोग्यसेवा दर्जेदार होण्यास उपयोग होईल, असेही पवार म्हणाले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते म्हणाले की, हृदयरोग तसेच मेंदूविकाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषेदेमार्फत दिली जणारी 15 हजार रुपयांची रक्कम वाढवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या रुग्णांना जिल्हा परिषद 25 हजार रुपयांची मदत करणार आहे. विषेश सभेत हा निर्णय घेण्यत आला आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, बारामती येथील महिला शासकीय रुग्णालयात भरविण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरास शहर व तालुक्‍यातील मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला. हजारो रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली. तालुक्‍यातील ग्रामीण भागातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती जाणवली. त्यामुळे महाआरोग्य शिबिराला जत्रेचे स्वरुप आले होते. तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शिबिराला येण्यासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात आली होती.

  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केल्याल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. बारामतीमध्ये रुग्णांची संख्या जास्त असल्याचे महाआरोग्य शिबिराला झालेल्या गर्दीवरुन स्पष्ट होते. आत्तापर्यंत 26 हजार रुग्णांना या शिबिराचा फायदा झाला आहे.

– रोहित पवार, सदस्य, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)