व्यवस्थेला मुक्‍का मारणारा “मुक्‍काबाज’

“मुक्‍काबाज’ ही कथा आहे बरेली सारख्या छोट्या शहरात राहणाऱ्या श्रवणसिंहची. “उत्तर प्रदेश का माईक टायसन’ व्हायचं हे एक स्वप्न उरी घेऊन तो जगत असतो. हेच स्वप्न घेऊन तो भगवानदास मिश्रा (जिमी शेरगिल) या फेडरेशन मधील दबंग व्यक्तीकडे जातो. तिथल्या कटू अनुभवांमुळे त्याच्यात आणि भगवानदास यांच्यात भांडण होतं. याचदरम्यान सुनैना (झोया हुसेन) म्हणजेच भगवानदासच्या भाचीशी त्याला प्रेम होतं. आपल्या स्वप्नाखातर श्रवण वाराणसीला जातो. तिथे त्याच्या प्रतिभेला कोच संजय कुमार(रवि किशन) ओळखतात. पुढे जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकल्यावर त्याला रेल्वेमध्ये नोकरी मिळते आणि भगवानदासच्या मर्जीविरुद्ध सुनैनाशी लग्नसुद्धा होतं. चिडलेला भगवानदास नॅशनल चॅम्पियनशिप मधून श्रवणला बाहेर करण्याचा शक्‍य तितका प्रयत्न कट-कारस्थान रचून करतो. अशाप्रकारे “मुक्काबाज’ हा श्रवणच्या एका सामान्य माणसापासून ते बॉक्‍सिंगमध्ये नाव कमावण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखित करतो.

विनीतसिंहने श्रवण उत्कृष्टरित्या साकारला आहे. चित्रपटातील विनीतचा संवादफेक आणि उत्तरप्रदेश मधील बोलीचा लहेजा उठून दिसतोय. विनीतने श्रवण बनण्यासाठी शरीरावर खूप मेहनत घेतली आहे आणि या पात्रासाठी बॉक्‍सिंगचे धडेसुद्धा गिरवले आहेत. “गॅंग्स ऑफ वासेपूर’ आणि “अगली’ मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यावर स्वतः लिहिलेल्या कथेतील मुख्य पात्राच्या भूमिकेला न्याय दिला आहे. “माईक टायसन है हम उत्तर प्रदेश के! एक ठोह धर दिये ना तो प्राण पखेरू हो जायेगा’ हा विनितचा डायलॉग ऐकताच आपसूकपणे टाळ्या वाजतात. त्याने रंगवलेली स्वप्नाच्या मागे धावणाऱ्या, दबावाला बळी न पडता स्वप्नांसाठी सर्व अडथळ्यांची मालिका पार करणाऱ्या या मध्यमवर्गीय तरुणाची भूमिका विनीतला एक अभिनेता म्हणून एका वेगळ्या उंचीवर नक्कीच घेऊन जाईल.

-Ads-

कोणत्याही चित्रपटातील हिरोच्या अस्तित्वाला अर्थ त्याच्या तोडीचा व्हिलन असल्यावरच येतो, या ओळीचं प्रत्यंतर मुक्काबाजमध्ये वारंवार येतं. चित्रपटादरम्यान भगवानदास मिश्राचा येणारा राग जिमीच्या सकस अभिनयाची पावतीच आहे. बोलके डोळे आणि आवाजातील वजन भगवानदासच्या पात्राला “चार चांद’ लावतात. “तनू वेड्‌स मनू’, “साहेब बिवी और गॅंगस्टर’ पासून दबंगी व्यक्तीचा अभिनय म्हणजे जिमी शेरगिल असं समीकरण तयार झालायं. मुळातच जिमी शेरगिल मला बॉलीवूड मधल्या अंडररेटेड ऍक्‍टर्सपैकी एक वाटतो. अभिनयक्षमता, साजेसा चेहरा आणि विविध एक्‍सपेरिमेन्ट करण्याची तयारी सर्व असून सुद्धा बॉलीवूड मध्ये त्याला जी जागा मिळायला हवी ती अद्यापही मिळाली नाही.

एकाहून एक सरस अभिनेते चित्रपटात असताना बाकीचे नवीन अभिनेते झाकोळल्या जाण्याची जास्त शक्‍यता असते. परंतु हे मुक्काबाजमध्ये घडलं नाही. झोयाने रंगवलेली सुनैना तिची वेगळी छाप सोडते व आपल्याला बऱ्याच वेळ लक्षातसुद्धा राहते. झोया हुसेन भगवानदासच्या भाचीच्या म्हणजेच मुक्‍या सुनैनाच्या भूमिकेत पडद्यावर सहज वावरते. चेहऱ्यावरील हावभावांची भाषा तिच्या पात्राची जमेची बाजू म्हणावी लागेल. रविकिशनने साकारलेला कोच अप्रतिम आहे. त्याने भरकटलेल्या श्रवणला योग्य रस्त्यावर आणण्याचं काम सहजतेने केलं आहे. त्याचे काही डायलॉग्स अंगावर काटे आणतात.
अनुराग कश्‍यप हा सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

चित्रपटाला फक्त खेळापुरतं मर्यादित न ठेवता सामाजिक विषमता, खेळात खोलपर्यंत रुजलेला भ्रष्टाचार आणि प्रभावक्षेत्राचं राजकारण या तिन्ही गोष्टींना अनुरागने योग्यरीत्या टिपलंय. सिनेमाच्या कथेला सध्याच्या सामाजिक, राजकीय सत्यस्थितीशी जोडून प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ सिनेमा व पात्र दाखवण्याऐवजी आपल्यापैकीच एक सर्वसाधारण नायक, आपल्यासारख्याच दैनंदिन संकटांना तोंड देऊन कशी आपली स्वप्न साकार करतो हे तो दाखवतो. यामुळे पडद्यावरच्या गोष्टी प्रेक्षकांना आपल्याशा वाटत आहेत. अशाप्रकारे चित्रपटाच्या जुन्या संकल्पना व चौकटी मोडण्याचं श्रेय नक्कीच अनुरागला जातं.

सोपी कथा, सकस अभिनय, साजेसं संगीत, उत्कृष्ट स्क्रीनप्ले हे मुक्काबाजचे वैशिष्ट्य. चित्रपटाची गती व लांबलेले काही दृश्‍य अशा काही उणिवा आहेत परंतु त्या दुर्लक्षिल्या जातात. खेळ आणि खेळाडूंवर चित्रपटांची रांग लागलेली असतानाही ‘मुक्काबाज’ आपली वेगळी छाप सोडून जातो. तो नुसता खेळावरच भाष्य न करता खेळविषयीची भारतातील अनास्थाही दाखवतो व अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. एकूणच “बहुत हुआ सम्मान, अब तेरी ऐसी की तैसी” म्हणणाऱ्या श्रवणसाठी, उत्कृष्ट अभिनय, कथा, संवाद व दिग्दर्शन अनुभवण्यासाठी “व्यवस्थेला’ मुक्का मारणारा मुक्काबाज नक्कीच पहायला हवा.

– शिवम पिंपळे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)