व्यवस्थेचा दोष; पोलिसांवर निघतो रोष

पुणे – शहरातील वाहतुकीची संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे. वाहनांची संख्या जवळपास 38 ते 40 लाखांच्या घरात गेली आहे. तर, मध्यवर्ती भागातील रस्ते मात्र पेशवेकालिनच आहेत. यामुळे कितीही प्रयत्न केले, तरी या भागातील वाहतूक कोंडी सुटत नाही. ऐन कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहनचालकांचीही चिडचिड होऊन मानसिकता आक्रमक होत आहे. याचाच रोष अनेकदा वाहनचालक वाहतूक पोलिसांवर काढताना दिसतात.

पुणे शहरातील वाढ 1990 नंतर शहराच्या चारही बाजूने झाली आहे. उपनगरे जशी वाढत गेली तशी वाहनांची संख्याही वाढत गेली. घरटी प्रत्येक व्यक्तीला एक वाहन असे प्रमाण सध्या दिसत आहे. यातच शहराच्या सर्व बाजारपेठा या मध्यवर्ती भागात आहेत. तसेच अनेक शाळा-महाविद्यालये आणि कार्यालये देखील मध्यवर्ती भागात आहेत. यामुळे साहजिकच शहराच्या चारही दिशेने वाहनांचा ओघ मध्यवर्ती भागात येत असतो. तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते हे पेशवेकालीन आहेत. मेणा, घोडे किंवा टांगा जाण्यासाठी असलेले रस्त्यांची लांबी व रुंदी अजूनही तितकीच आहे. यामुळे लाखो वाहने आणि पादचाऱ्यांचा भार पडल्यावर रस्त्यावर आपसूकच वाहतूक कोंडी होत असते. ती सोडविण्यासाठी वाहतूक विभागाने काही रस्ते वन-वे देखील केले आहेत. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता हे प्रमुख रस्ते वन-वे केले गेले. मात्र त्यानंतरही वाहतूक कोडी सुटताना दिसत नाही. या रस्त्यांना मिळणारे अनेक गल्ली-बोळातील रस्तेही कार्यालयीन वेळेत कोंडलेले असतात.

साहजिकच कामावर व महाविद्यालयात जाताना वाहतूक कोंडीत अडकल्यास नागरिकांची चिडचिड होत असते. दररोजचाच हा प्रश्‍न असल्याने साहजिकच याचा राग चौकात उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांवर काढला जातो. लवकर जाण्याच्या गडबडीत वाहतुकीचे नियम मोडले जातात. यातच वाहतूक पोलिसाने धरले तर त्याच्याशी वादावादी घातली जाते. याचे रुपसंतर अनेकदा शिविगाळ आणि धक्काबुक्की होते. प्रत्येक वेळी नवीन आलेले वाहतूक पोलीस उपायुक्त नवनवे प्रयोग करतात. मात्र, याचा वाहतूक कोंडी सोडवण्यावर कोणताच परिणाम होताना दिसत नाही. जोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत नाही, तसेच नागरिक स्वयंशिस्त पाळत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम रहाणार आहे. मेट्रो आल्यानंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कितपत संपेल हे सांगता येत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)