व्यक्‍तिमत्त्व : शिकत राहा   

सागर ननावरे

क्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाबद्दल काढलेले हे गौरवोद्‌गार. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे आज 11 नोव्हेंबर, “राष्ट्रीय शिक्षण दिवस. या दिवशी भारत सरकारने संपूर्ण देशात शिक्षण अधिकार अभियान सुरू केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते; कारण या शिक्षणरूपी दुधाची ताकद त्यांनी अनुभवली होती.

स्वातंत्रपूर्व काळात शिक्षणाबाबत उदासीन असलेला समाज स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वळला. यात शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजसुधारकांचे खूप मोठे योगदान आहे. समाज शिक्षित झाला तरच देश महासत्ता म्हणून उदयास येऊ शकतो, याची समाजसुधारकांना कल्पना होती. आणि म्हणूनच स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची गंगा वेगाने देशभरात पोहोचली.

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बदलत्या जगात आपले स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही. मग ते औपचारिक असो किंवा अनौपचारिक शिक्षण. सरासरी वयाच्या व्या वर्षापर्यंत पदवी घेऊन आपण औपचारिक शिक्षणाचा पाया भक्कम करीत असतो. यानंतरही अनेकजण वेगवेगळ्या पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र देणारे शिक्षण घेत असतात.

परंतु औपचारिक शिक्षणानंतर मात्र संसाराच्या जबाबदाऱ्या आल्याने शिक्षणाला पूर्णविराम दिला जातो. अनुभवाच्या शिदोरीवर जीवनाचा गाडा कसाबसा रेटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. आणि यामुळे आयुष्य जगण्याचा तोच तोचपणा अधिकाधिक ठळक होत जातो. पोटापाण्यापुरता खटाटोप करण्याकडे आपला कल वाढत जातो . आयुष्यातील स्वप्ने दिवसेंदिवस मोठी होण्यापेक्षा आकांक्षापूर्ती त्यांना चाकोरीमाध्येच अडकवून ठेवते.

अशी माणसे आयुष्यात मिळवलेल्या मुठभर यशाचे गुणगान आयुष्यभर गात बसतात. हे सारे घडते ते शिक्षणाचे महत्त्व कालानुरूपे साचेबध्द करून ठेवल्यामुळे. शिक्षण हे माणसाला बदलत्या जगाप्रमाणे बदलायला शिकवते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावून एक यशस्वी आणि आधुनिक जीवनशैली जगण्याचा अनुभव देते.,आणि म्हणूनच शिक्षण घेण्यासाठी वयाची किंवा अनुभवाची अट नसते. शिक्षण घेण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती आणि सकारात्मक मानसिकता. केवळ साक्षर होणे म्हणजे शिक्षण नाही. तर आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास करणारे साधन म्हणजे खरे शिक्षण होय.

माणसाने सतत काही ना काही शिकले पाहिजे. ज्ञान आत्मसात करण्याची भूक सतत आपल्याला असायला हवी. वय कितीही असो आयुष्याच्या शाळेत आपण विद्यार्थी म्हणून जगायला हवे.व्यावहारिक आणि समृध्द अनुभवांची शिकवणी आपण चालू करायला हवी.अनुभव आणि नवनवे ज्ञान देणाऱ्या साधनांना शिक्षक मानून सतत काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

समाजात आजही अनेक ठिकाणी “हे काय आता शिक्षणाच वय आहे का?” “साठी बुद्धि नाठी” यासारखे शब्द वापरले जातात. मुळात लोक काय म्हणतील हा दृष्टीकोनही शिक्षणाला मारक ठरत असतो. आणि यापलीकडे जाऊन सांगायचे झाल्यास आपण स्वतःच स्वतःला शिक्षणापासून दूर लोटत असतो. अनेक कारणे आणि बहाणे पुढे करून त्यापासून स्वतःला दोन हात लांब ठेवत असतो. वाढत्या वयानुसार शिकताना”आता स्मरणशक्ती साथ देत नाही”, ‘आता या वयात कुठे इमले बांधायचे आहेत” अशी नानाविध वाक्‍ये सर्रास बोलत असतो. परिणामी आहे त्यात समाधान मानून निवृत्तीचे जीवन जगायला कधी सुरुवात होते हे कळतही नाही.

आज शिक्षण दिन. या दिनाच्या निमित्ताने आपण आपली मानसिकता बदलायला हवी. शिक्षणाबद्दल नेहमी सकारात्मक असायला हवे. बदलत्या जगाबरोबरच स्वतःही बदलायला हवे. आज तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाचा कक्षा दिवसेंदिवस सीमा ओलांडत चालल्या आहेत. ज्ञानात सातत्य राहिलेले नाही. कारण जे आज रूढ आहे ते उद्या तसेच असेल याची शास्वती राहिलेली नाही. म्हणूनच आपणही सतत अपग्रेड राहायला हवं. नुकतेच परदेशात झालेल्या एका निरीक्षणातून असे आढळून आले आहे की,”सतत शिकत राहिल्यामुळे मेंदू नेहमी तरुण आणि कार्यरत राहतो. आणि त्यातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून येत असतो.”

चला तर मग या शिक्षण दिनानिमित्त एक संकल्प करूया. जगण्याच्या शाळेत विद्यार्थी बनून नवनवीन गोष्टी सतत शिकत राहूया. शिक्षणाने आपली ध्येये,क्षमता आणि ज्ञान अधिकाधिक समृध्द करूया. केवळ वाचणे किंवा अभ्यास करणे हे शिक्षण नसून, शिकलेल्या गोष्टी आचरणात आणण्याच्या शिक्षणात साक्षर होऊया. कारण कठीण प्रसंगात किंवा कसोटीच्या क्षणी हेच शिक्षण आपल्याला तारणार आहे. हा शिक्षण दिन आपल्या आयुष्यात निरंतर शिक्षणाबाबत सकारात्मक आशावाद निर्माण करो हीच अपेक्षा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)