#व्यक्‍तिमत्त्व:  कृष्णगाथा एक प्रेरणास्रोत 

सागर ननावरे 
आज अष्टमी. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. हिंदू धर्मात आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. मला आठवतं, अगदी बालपणापासूनच मला श्रीकृष्णाबाबत विशेष आकर्षण. कारण लहानपणी शाळेच्या पुस्तकात भगवान श्रीकृष्णाच्या साहसाच्या गोष्टी मनाला खंबीर बनवायच्या आणि शाळेतून घरी परतल्यावर दूरदर्शनवर रामानंद सागर निर्देशित “श्रीकृष्णा” मालिका तर कधी चुकवलीच नाही.
मग अगदी श्रीकृष्णाचा जन्म, खोडकर बालपण, सुदाम्याशी असलेली मैत्री, कालिया नागाचे मर्दन अशा अनेक गोष्टींनी भगवान श्रीकृष्णाला जीवनात आदर्शाची जागा दिली.  जसजसे बालपण सरू लागले, तसतसा मनातील श्रीकृष्णव्यास अधिकाधिक रुंदावत गेला. श्रीकृष्णाची विविध अंगे आणि रूपे जीवन जगण्याचा प्रेरणादायी असा स्रोत बनत गेली.
आज जन्माष्टमीच्या निमित्ताने जीवनात मार्गदर्शक ठरणारी प्रेरणादायी कृष्णगाथा प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. आज जन्म अष्टमी, अष्टमी म्हणजेच आठ. चला तर मग आपल्या जीवनात प्रेरणादायक ठरणाऱ्या भगवान श्रीकृष्णाबाबतच्या आठ गोष्टी समजून घेऊ या.
1. ज्ञान वाटल्याने वाढते : महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच पांडवांचा विजय सुकर झाला. जर भगवान श्रीकृष्णाने आपल्याकडील ज्ञान संदेशरूपाने अर्जुनाला सांगितले नसते, तर काय झाले असते हे वेगळे सांगायची गरज नाही. आपणही आपल्याकडे असणारे ज्ञान इतरांच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी उपयोगात आणायला हवे. आपण जे काही शिकलो आणि ज्याचा आपल्याला फायदा झाला अशा गोष्टी इतरांच्या भल्यासाठी त्यांच्याशी शेअर करायला हव्यात.
2. निडर बना : श्रीकृष्णाने कालीया नागाचे मर्दन करून हे दाखवून दिले की आपल्याला निर्भीडपणे परिस्थितीचा प्रतिकार करता आला पाहिजे. आपल्या समोरील प्रतिकूल परिस्थितीचा आपल्याला निर्भीडपणे सामना करता आला पाहिजे. आपल्याला अनेकदा व्यक्तीची, प्रवृत्तीची,अपयशाची आणि इतर गोष्टींची भीती वाटत असते. ही भीती पुढे जाऊन आपल्या असमर्थतेचे कारण बनत असते.
3. दूरदर्शी व्हा : भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीतून त्याच्यात असलेला दूरदर्शीपणा दिसून येतो. महाभारतात त्यांच्यात असलेल्या दूरदृष्टीमुळेच त्यांना अर्जुनाला अमूल्य मार्गदर्शन करता आले. म्हणूनच नुसतीच दृष्टी असून उपयोग नाही, तर दृष्टिकोन आणि दूरदृष्टी असणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. . स्पर्धेच्या युगातही आपण आपली सर्व क्षमता,शक्ती आणि कल्पकता यांचा दूरदृष्टीने विचार केला पाहिजे.
4. मित्र जोडा : श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात. बालपणीसुद्धा श्रीकृष्णाने जिवाभावाचे सवंगडी जोडले होते. म्हणूनच आजही म्हणतात ‘सखा सवंगडी असावा श्रीकृष्णा परी’. आपणही आपल्या जीवनात भरपूर चांगले मित्र जोडायला हवेत. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होऊन मैत्रीतील गोडवा वाढवायला हवा. कारण अनेक वेळा पैसा नाही, तर माणसे उपयोगात येतात.
5. नियोजन करा : सुनियोजित तयारी असेल तर रणांगणावर विजय मिळवणे सहजसोपे होऊन जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील श्रीकृष्णनीती. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याकडे नियोजनक्षमता असायला हवी. कारण असे म्हणतात की नियोजन करणे म्हणजे पन्नास टक्के काम कृतीआधीच पूर्ण केल्याचे समाधान मिळवणे होय.
6. शिकत राहा : भगवान श्रीकृष्णाने जरी अर्जुनाला शिकवण दिली असली, तरी ते स्वतःसुद्धा अनुभवातून शिकत राहिले आणि हेच अनुभव कठीण प्रसंगी उपदेश म्हणून इतरांच्या कामी आले. म्हणूनच आपण नेहमी शिकण्याची वृत्ती अंगी बाळगली पाहिजे. कारण सतत शिकणे हे माणसाचे जीवन सहज सुकर आणि यशस्वी होण्यास सहायभूत ठरत असते.
7. वेळेप्रमाणे भूमिका बदला : भगवान श्रीकृष्णाने योग्य वेळ पाहून आपली भूमिका नेहमीच बदलली. अगदी अर्जुनाचा सारथी होऊन त्याला साथ देण्याची भूमिकाही त्यांनी उत्तमरीत्या निभावली. यातून आपल्याला हे शिकायला हवे, की आपली भूमिका ही बंदिस्त नसावी. वेळेप्रमाणे आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी आपल्याला आपल्यात बदल करता आला पाहिजे.
8. आदर्श बना : श्रीकृष्ण हे पांडवांसाठी,गोकुळासाठी,सख्यांसाठी, मित्रांसाठी, भक्तांसाठी आणि सर्वांसाठी नेहमीच आदर्श राहिले आहेत. उपदेशातून आणि सदचारातून लोकांसाठी आदर्शवत असे दैवीव्यक्तिमत्व म्हणून ते आजही लोकांच्या मनामनात वसले आहेत. आपल्या वर्तनातून,वृत्तीतून आणि कर्तृत्वातून आपणही इतरांचा आदर्श बनायला हवे.
चला तर मग या अष्टमीला श्रीकृष्णनीतीच्या आठ गोष्टी आचरणात आणून एक आदर्श व्यक्तिमत्व उदयास आणूया. सर्व बालगोपाळांना आणि भक्तगणांना जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)