#व्यक्‍तिमत्त्व: किक पाहिजे 

सागर ननावरे 
जून महिन्याच्या अखेरीस आम्ही मित्रपरिवार टीव्हीवर अर्जेन्टिना आणि नायजेरियाचा सामना पाहात होतो. सामना पाहताना आमच्या गप्पाही रंगत आल्या होत्या. माझा एक मित्र आम्हा सर्वांना उद्देशून गंभीरपणे म्हणाला, “यार, लहानपणी जर माझा पाय मोडला नसता; तर आज मी सुद्धा एक फुटबॉल खेळाडू झालो असतो. आम्ही त्याला विचारले असे काय झाले होते?
त्यावर तो बोलला,’ मी आमच्या शाळेतला फुटबॉल चाम्पियन होतो पण एकदा झाडावरून पडलो पाय मोडला आणि फुटबॉल सोडावा लागला. मग मी त्याला बोललो,” परंतु मग पाय बरा झाल्यावर तू पुन्हा खेळू शकला असतास ना?
तो बोलला, “त्यानंतर प्रयत्न केला खेळायचा, पण मैदानात गेलो की पाय दुखायचा.” माझ्या लक्षात आले होते. दुखणे वगैरे ही तर फक्त अशक्त मानसिकतेची लक्षणे असतात.
नकारात्मकता, आजार, व्याधी, समज आपल्याला मानसिकदृष्ट्या अशक्त करीत असतात. मला अमुक झाले म्हणून तमुक करू शकत नाही. अशा एक ना अनेक मानसिक व्याधी आपण आपल्यासोबत घेऊन फिरत असतो. पण मुळात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द असेल, तर आपण सर्व काही करू शकतो. मी विषय पुढे नेला आणि सर्वांना सांगू लागलो.
आज या फुटबॉलबद्दलची एक प्रेरणादायी सत्यकथा मी आपल्याशी शेअर करणार आहे. सर्वजण माझ्याकडे नजरा रोखून शांतपणे मला ऐकू लागले. मी सांगू लागलो, मित्रांनो जगातील सर्वाधिक लोकप्रिय समजला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल आणि त्यातील या वर्ल्डकप मधील आघाडीचे नाव म्हणजे आपला फेव्हरेट अर्जेन्टिनाचा “लियोनेल मेस्सी.”
मित्रांनो मेस्सीला बालपणापासूनच फुटबॉल खेळाची प्रचंड आवड होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्याने एका नामांकित क्‍लबमधून फुटबॉलचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुढे वाढत्या वयानुसार मेस्सीची खेळातील निपुणता ही वाढत चालली होती. फुटबॉलच्या खेळात ऐन भरात असताना मेस्सीला एका दुर्धर आजाराने ग्रासले. शरीरातील हार्मोन्स वाढीच्या संथगतीमुळे शरीराचा संपूर्ण विकास खुंटण्याच्या भीतीची नामुष्की त्याच्यावर ओढवली होती. ही घटना हा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी एक मोठा धक्काच होता. त्याचे वडील मजूरकाम करीत असल्याने परदेशात जाऊन अत्याधुनिक उपचार देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढे पैसेही नव्हते.
मेस्सी यापुढे कधीच फुटबॉल खेळू शकणार नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु हार मानेल तो मेस्सी कसला? तो त्या आजाराशी झुंजत राहिला. त्यासाठी तो इंजेक्‍शन घेऊन वेदनांवर तात्पुरती का होईना मात करीत राहिला. पण त्याने फुटबॉल खेळणे सोडले नाही. त्याची ही जिद्द पाहून त्याच्या वडिलांच्या मित्राने त्याला बार्सिलोना क्‍लबला नेण्याचा सल्ला दिला. बार्सिलोना क्‍लब हा फुटबॉल खेळाडूंसाठी मोफत उपचार देत असे. मेस्सी बार्सिलोना क्‍लब मध्ये सहभागी झाला. पुढे त्याचा संपूर्ण उपचार बार्सिलोना क्‍लबने केला आणि त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे त्याने स्पेनच्या बार्सिलोना क्‍लबकडून खेळतानाच आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण केले आणि तो फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू म्हणून उदयास आला.
मित्रांनो जेव्हा मेस्सीला समजले, की आजारामुळे कदाचित फुटबॉलचा कायमचा त्याग करावा लागणार आहे; त्यावेळी जर हार मानली असती; त्या वेदना आणि नकारात्मक संवेदना उराशी बिलगून ठेवल्या असत्या, तर आज मेस्सी कुठे असता? तो फुटबॉल जगतातला स्टार प्लेयर झाला असता का ? सर्वांनी एका लयीत नकारात्मक मान फिरवली. मी पुढे सांगू लागलो, मित्रांनो, मेस्सीने आपल्या जिद्दीच्या आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवला.
एव्हाना सर्वांना माझ्या बोलण्यातील गर्भितार्थ चांगलाच कळाला होता. ज्या मित्राने पाय दुखावला म्हणून फुटबॉल सोडला होता, तो तर विचारातच पडला होता. प्रेरणेची एक किक डायरेक्‍ट त्याच्या मनाला जाऊन बसली होती. मित्रांनो, कारणे पुढे करून हतबल होण्यापेक्षा कारणांवर मात करून यश मिळविणे केव्हाही चांगलेच. म्हणूनच परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा तिच्यावर मात करून इतरांसमोर आपला आदर्श ठेवला पाहिजे. यशासाठी एक किक आपल्यालाही मिळायला हवी. किंबहुना ती आपणहून घ्यायला हवी.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)