वॉटरप्रुफींगच्या नावाखाली अनधिकृत बांधकामे?

पाहणी करून बाजार समिती प्रशासन घेणार कारवाईचा निर्णय

पुणे – मार्केट यार्डातील भुसार बाजारात वॉटरप्रुफींगच्या नावाखाली अनधिकृतपणे गाळ्यांची पुनर्बांधणी सुरू आहे. विशेष म्हणजे या बांधकामाला महापालिकेची परवानगी देण्यात आलेली नाही. या बांधकामाचा एक स्लॅब पूर्ण झाला. तरीही बाजार समिती प्रशासन गप्प आहे. अर्थपूर्ण संबंधांमुळेच अशा बांधकांना पाठींबा मिळत असल्याची बाजार घटकांमध्ये चर्चा आहे.

-Ads-

गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागात सध्या अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. किरकोळ दुरुस्त्यांच्या नावाखाली काही व्यापारी अनधिकृतपणे अतिरिक्त बांधकामे करत आहेत. गुळ-भुसार विभागात तीन गाळे पाडून तिथे नव्याने गाळ्याची उभारणी सुरू आहे. गाळा पुनर्बांधणीसाठी बाजार समितीसह महापालिकेची परवानगी आवश्‍यक असते. मात्र, बाजार समितीकडून वॉटर प्रुफींग परवानगीच्या नावाखाली संबंधित व्यापाऱ्यांनी नव्याने गाळा बांधकाम काढले आहे. सध्या या बांधकामाचा एक स्लॅब पूर्ण झाला. तरीही बाजार समिती प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाला बाजार समिती प्रशासन पाठीशी घालत आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी संबंधित बांधकामाची पाहणी करणार आहे. त्या बांधकामाला परवानगी आहे की नाही, हे पाहून पुढील कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले.

विभागप्रमुखांचे दुर्लक्ष?
मार्केट यार्डातील गुळ-भुसार, भाजीपाला, फळे, फुले, कांदा-बटाटा, पानबाजार आदी विभाग आहेत. संबंधित सर्व विभागांना विभागप्रमुख नेमण्यात आले आहेत. आपल्या विभागातील दैनंदिन कामकाजासह अनधिकृत बांधकांमाची माहिती अतिक्रमण विभाग आणि समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यावर कारवाईची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असते. मात्र, गुळ-भुसार विभागात अनधिकृत बांधकामे सुरू असतानाही त्याकडे संबंधित विभाग प्रमुख का दुर्लक्ष करत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)