पुणे- अपघातात जखमी झालेल्या वॉचमनच्या कुटुंबीयांना साडेदहा लाख रुपये देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या महालोकअदालमध्ये झाला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांच्या पॅनेलसमोर तडजोडीअंती हा निर्णय झाला.
शशिरंजनसिंग (वय 48, रा. वाघोली, मूळ. बिहार), असे अपघातात मृत्यू झालेल्या वॉचमनचे नाव आहे. त्यांची पत्नी आणि तीन मुलांनी मिळून ऍड. अनिल पटनी आणि ऍड. अशिष पटनी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. ही घटना दि. 10 जानेवारी 2017 रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी शशिरंजनसिंग वाघोली येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी खासगी बसने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते बिहार येथून महाराष्ट्रात आल्यानंतर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. घरातील कर्ते होते. त्यांना दरमहा आठ हजार रुपये पगार होता. त्यामुळे जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ऍड. अनिल पटनी आणि ऍड. अशिष पटनी यांनी एप्रिल 2017 मध्ये दावा दाखल केला होता. शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये तडजोडीअंती साडेदहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्या वॉचमनच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)