वैश्‍विक चोर (अग्रलेख)

विज्ञान आणि तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे. त्याचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी निश्‍चितच करता येता; किंबहुना तो केलाही जात आहे. मात्र, त्याचवेळी जर ही तलवार विध्वंसक आणि विकृत मनोवृत्तीच्या लोकांच्या हाती गेली, तर विनाशच होतो, हे अटळ सत्य आहे. विज्ञानाचा जसजसा विकास होत गेला तसतशा अशा विध्वंसक वृत्ती आणि त्यांनी केलेली विनाशकारी कृत्ये आपण पाहिली आहेत. मात्र, त्यातून काही धडा घेतला गेला नाही. तसे करताही येणार नाही. त्याला कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रवास हा एकाच दिशेने अव्याहतपणे पुढे जाणारा आहे. त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न करता येत नाही आणि तसे कोणी करूही शकत नाही.

चोर नेहमी एक पाऊल पुढे असतात हेही वास्तव आहे. सरकारनेही फेसबुकच्या विरोधात कारवाईची घोषणा केली आहे. मात्र, दिवसाढवळ्या बॅंकांना कायदेशीर मार्गाने हजारो कोटींचा चुना लावून लोक राजरोसपणे परदेशात जाऊन आपल्याला तेथून वाकुल्या दाखवत आहेत; त्यांना पकडणे अवघड झाले आहे; तेथे ज्याला चेहराच नाही व जे हातालाच लागणार नाहीत, अशा “वैश्‍विक चोरांवर’ सरकार काय आणि कशी कारवाई करणार, हा मोठाच प्रश्‍न आहे.

याचा प्रत्यय फेसबुकच्या डाटा चोरीवरून आता पुन्हा एकदा आला आहे. आज संपूर्ण जगात सोशल मीडियाचा जबरदस्त बोलबाला आहे. लाखो सैनिक शस्त्र घेऊन सीमेवर जे करू शकत नाही, ते तंत्रज्ञानाचा अथवा या सोशल मीडियाचा वापर करून एखादी व्यक्‍ती एखाद्या खोलीत बसून काही क्षणांत करू शकते. गेल्या पाच ते दहा वर्षांत जगातल्या काही देशांत अचानक निर्माण झालेली अस्वस्थता, त्यातून शांततेने व प्रसंगी हिंसक मार्गाने गेलेली आंदोलने ही त्याची मूर्तिमंत उदाहरणे. “इसिस’सारख्या कोणताही चेहरा समोर नसलेल्या दहशतवादी संघटनांचाही जगभरात अत्यंत कमी काळात प्रचंड वेगाने झालेल्या प्रसाराच्या मुळाशीही हेच तंत्रज्ञान आहे.

या सोशल मीडियाच्या क्षेत्रातले एक बडे नाव किंवा महाशक्‍ती म्हणता येईल अशा फेसबुकच्या संदर्भात त्यामुळेच जेव्हा त्यांचा डाटा चोरीला जातोय, ही माहिती आली तेव्हा केवळ सरकारेच नव्हे, तर सर्वसामान्य फेसबुक वापरकर्ताही हादरला. त्याची सुरुवात झाली, अमेरिकेतील व्यापारी एजन्सीने केलेल्या आरोपांपासून. त्यानुसार अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत फेसबुकने पाच कोटी नागरिकांचा डाटा अर्थात माहिती चोरली व डोनॉल्ड ट्रम्प यांच्या विजयात त्या चोरीचा मोलाचा हातभार लागला. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा अर्थात “ब्रेक्‍झिट’चा ऐतिहासिक निर्णय घेतला, तेव्हाही अशाच प्रकारच्या चोरीची मदत घेण्यात आली.

एखाद्या देशाच्या इतिहासावर आणि भूगोलावरही दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय अशा चोरलेल्या माहितीच्या आधारे होणार असतील किंवा अशी चोरलेली माहितीच जर अनपेक्षित बदलांना हातभार लावणार असेल, तर हे फारच मोठे आव्हान सगळ्याच जगापुढे उभे राहीले आहे, यात शंका नाही. केवळ अमेरिका, ब्रिटन किंवा युरोपियन संघापुरताच हा विषय नाही. अथवा हॉलीवूडच्या एखाद्या साय-फाय चित्रपटाचीही ही कथा नाही. हा धोका जगभरच पसरला आहे; कारण सोशल मीडियाने सगळीकडेच पाय पसरले आहेत. मात्र, ज्या वेगात त्याचा प्रसार झाला त्या वेगात त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही.

आज भारतातही ढोबळमानाने 20 ते 25 कोटी नागरिक सोशल मीडियाचा वापर करतात. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांची माहिती त्या त्या वेळी तेथे नोंदवली जाते. त्यातील 550 लाख जणांची माहिती चोरली गेल्याचे म्हटले जातेय. डाटा चोरीच्या संदर्भात “केंब्रिज ऍनालिटीक’ या संस्थेचे नाव पुढे आले आहे. अमेरिका, ब्रिटन, ब्राझील आणि भारतासह बऱ्याच देशांत ही संस्था निवडणुकीच्या संदर्भात सेवा पुरवते. चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर त्या संस्थेच्या सीईओला पदमुक्‍त करावे लागले. त्यावरूनच आता भारतातील राजकीय वातावरणही तापले आहे. भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेसकडे बोट दाखवत कॉंग्रेस या कंपनीची सेवा घेण्याची तयारी करत असून त्यांना काही माहिती मिळाली असल्याचा आरोप केला आहे.

तर खुद्द भाजपनेच सन 2010 च्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या वेळी “केंब्रिज’ची मदत घेतली होती, असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप जरी तूर्त बाजूला ठेवले, तरी निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी या माहितीचा वापर केला जात आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. बरे, ही माहितीही त्यांच्याकडून चोरली जातेय, ज्यांच्यावर आपण अंधासारखे विसंबून राहून त्यांच्याच हातात आपल्या चलनवलनाच्या सर्व किल्ल्या दिल्या आहेत. आज देशातल्या महानगरांचा विचार केला तर स्मार्ट फोन आणि त्याच्यामार्फत इंटरनेट आणि फेसबुकसारखी समाजमाध्यमे केवळ घराघरातच नव्हे, तर त्या प्रत्येक घरातल्या किचनपर्यंत पोहोचली आहेत. घरात एक वेळ दुसरे कोणी नसले तरी चालेल पण हातात स्मार्ट फोन आणि त्यावरचे फेसबुक सुरू असले पाहिजे, ही अपरिहार्यता झाली आहे.

झाल्या प्रकाराबद्दल फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी माफी मागितली आहे. भारतातील निवडणुकांच्या अगोदर डाटा चोरी रोखण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. मात्र, चोर नेहमी एक पाऊल पुढे असतात हेही वास्तव आहे. सरकारनेही फेसबुकच्या विरोधात कारवाईची घोषणा केली आहे. मात्र, दिवसाढवळ्या बॅंकांना कायदेशीर मार्गाने हजारो कोटींचा चुना लावून लोक राजरोसपणे परदेशात जाऊन आपल्याला तेथून वाकुल्या दाखवत आहेत; त्यांना पकडणे अवघड झाले आहे; तेथे ज्याला चेहराच नाही व जे हातालाच लागणार नाहीत, अशा “वैश्‍विक चोरांवर’ सरकार काय आणि कशी कारवाई करणार, हा मोठाच प्रश्‍न आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला आपल्या भारताचा विचार करता ह्या फहेस बुक मुले कशा प्रकारे चोरी होते व kiti ठिकाणे आहेत कि जी अशी चोरी होण्यास कारण ठरू शकतात ह्याचा सविस्तर खुलासा वरील अग्रलेखात होणे गरजेचे होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)