वैशाखखेडे येडगाव मार्गे जुन्नर रस्त्याची दुरवस्था

दुरुस्तीची मागणी ः परिसरातील अनेक गावांना आहे या रस्त्याचा फायदा
पिंपळवंडी  -वैशाखखेडे येडगाव मार्गे जुन्नर या रस्त्याची अत्यंत वाईट दुरवस्था झाली असून या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
राजुरी ते येडगाव हा जुना मार्ग असून तो राजुरीहून पिंपळवंडी वैशाखेडे येडगाव मार्गे पुढे जुन्नरला जातो हा रस्ता कच्चा आहे. हा मार्ग विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतुकीस अत्यंत जवळचा आहे. तसेच राजुरी, आळे, पिंपळवंडी, वडगाव आनंद, बोरी या ठिकाणांहून जुन्नरला जाण्यासाठी सोयीचा आणि जवळचा मार्ग आहे. परंतु हा रस्ता कच्चा असल्यामुळे या रस्त्यावरून फारशी वाहतूक होत नाही; मात्र परिसरातील शेतकऱ्यांना या रस्त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होत आहे. शेतीमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सध्या या रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून या रस्त्यावर खड्डे आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचते व चिखल होतो. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहने घसरून पडतात तर शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते. हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आह. दुरूस्तीबाबत शासनाकडे अनेकवेळा मागणी करूनही हा रस्ता दुरुस्त केला जात नाही. हा रस्ता होणे ही काळाची गरज असून पिंपळवंडी आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीकोनातून होणे अत्यंत गरजेचे आहे. येथील नागरिकांना जुन्नरला जाण्यासाठी चौदानंबर मार्गे येडगाव व पुढे जुन्नरला जावे लागते. जर हाच रस्ता दुरुस्त झाला तर वैशाखेडेमार्गे येडगाव व पुढे जुन्नरला जाणे सोयीचे होईल. हा रस्ता झाल्यास पिंपळवंडी परिसरात असलेल्या गावांमधील नागरिकांचे पाच ते सहा किलोमीटर अंतर वाचणार आहे त्यामुळे शासनाने या सर्व बाबींचा विचार करुन हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ बाबाजी टाकळकर, दत्ता टाकळकर, राजेंद्र टाकळकर, निलेश शिंदे, गणेश शिंदे, किरण शेटे, सुभाष शेटे, अशोक शेटे, राजेंद्र शिंदे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)