वैरण ज्वारी पशुपालनासाठी उपयोगी

योग्य वाणाची निवड व योग्य लागवड तंत्राचा उपयोग केल्यास जास्तीत जास्त वैरणीचे उत्पादन मिळविता येते व जनावरांच्या वैरणाचा प्रश्‍न सोडविता येतो. गायी, म्हशी व बैलांच्या संगोपना करीता वैरणीची नितांत आवशक्‍यता असते. आजच्या काळात दूध उत्पादक शेतकरी बंधु समोरील प्रमुख अडचण म्हणजे सकस चाऱ्याची वर्षभर उपलब्धता होय. कमीत कमी क्षेत्रातुन जास्तीत जास्त वैरणीचे उत्पादन मिळविण्याकरीता वैरण ज्वारीची लागवड फायदेशीर ठरते.

जमीन : मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन वैरण लागवडी करीता निवडावी. वैरण ज्वारीची लागवड हलक्‍या जमिनीत करणे टाळावे कारण हलक्‍या जमिनीत वैरणीचेउत्पन्न कमी मिळते. उन्हाळ्यात वखराच्या एक दोन पाळया देऊन जमीन पेरणीस तयार करावी.

पेरणीची वेळ : वैरण ज्वारीचे पीक जर कोरडवाहू परिस्थितीत घेत असल्यास 20 ते 30 जुन ही पेरणीची योग्य वेळ आहे. ज्या भागात वैरणीचे पीक ओलीताखाली घ्यावयाचे आहे, त्या भागात 15 ते 25 जुन पर्यंत पेरणी करावी. उशीरा पेरणी केल्यास खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे उत्पन्नामध्ये फार घट येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बियाणे आणि पेरणीची पध्दत : वैरण ज्वारीच्या बहुकापणी वाणांसाठी प्रती हेक्‍टर 10 ते 12 किलो बीयाणे वापरावे व एक कापणी वैरणीच्या ज्वारी लागवडी करीता हेक्‍टरी 40 ते 50 किलो बियाणे वापरावे. बियाणे फेकुन पेरणी करण्यापेक्षा ओळीत तिफणीने पेरल्यास जास्त उत्पन्न मिळते. ज्वारीचे बी पेरतांना दोन ओळीतील अंतर 25 ते 30 सेंटीमीटर ठेवावे व बी तीन ते चार सेंटीमीटर खोलीवर पेरावे. बियांची उगवण चांगली होते.

योग्य वाणांची निवड : एकेरी कापणी (सिंगल कट) करीता पुसाचारी6 ,एम.पी.चारी, सुधारीत रामकेळ,नंदियाळ, आयजी.एफ.आरआय. 1, आय.बी.एफ.आर.आय.2 इत्यादी वाण योग्यअसून त्यापासून हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याचे उत्पन्न मिळते. अधिकतम कापणी (मल्टी कट) करीता जवाहर चारी 69 एसएस.जी.59-3, एस.एस.जी988, सी.एस.एच.-20 हे वाणपेरणी करीता योग्य आहेत. सुधारीत रामकेळ व एम.पी.चारी हण कडबा व धान्य या दुहेरी उद्देशाने घेण्यास योग्य आहेत.

खताची मात्रा : एकेरी कापणी ज्वारीला 40 किलो नत्र व 40 किलो स्फुरद पेरणी सोबत दयावे व 40 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी दयावे. अधिकतम कापणी ज्वारीला 40 किलो नत्र व 40 किलो स्फुरद पेरणी सोबतदयावे आणि 40 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी व 25 किलो नत्र प्रत्येक कापणी नंतर दयावे.
ओलीत व्यवस्थापन : जर मान्सूनचा पाऊस आला नाही तरएक किंवा दोन ओलीताच्या पाळया10 ते 15 दिवसाच्या अंतराने दयाव्यात. अधिक कापणी देण्याच्या ज्वारीच्या वाणाला जास्त ओलीताची आवश्‍यकता असते. ज्वारी पिकाला कापणी नंतर फुटवे फुटण्यास तसेच जलद वाढ होण्याकरीता कापणी नंतर खत व ओलीत करणे आवश्‍यक आहे.

आंतरपिके : वैरणीच्या ज्वारीमध्ये आंतरपिके म्हणून मुग,सोयाबीन, चवळी, गवार यासारखी पिके घ्यावीत. या कडधान्याच्या पिकामुळे चाऱ्याची प्रत सुधारते व चाऱ्यामधील प्रथिनांचे प्रमाण वाढते.

कापणी : एकेरी कापणी ज्वारीची कापणी पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी करावी व अधिकतम कापणी ज्वारीची पहिली कापणी पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी व नंतरच्या कापण्या 40 दिवसांच्या अंतराने कराव्यात वैरणीची ज्वारी उगवल्यानंतर 40 दिवसांपर्यंत तसेच कापणीनंतर फुट वाढीच्या वेळी हायड्रोसायनिक आम्लाची निर्मिती होत असते. हे रसायन जहाल विषारी असल्यामुळे कोवळे फुट किंवा चारा 40 दिवसांपर्यंत जनावरांना खाण्यास अयोग्य असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत 40 दिवसांपुर्वी वैरणीच्या ज्वारीची कापणी करु नये.

उत्पादन : वैरणीच्या ज्वारीचे एकेरी कापणीचे हेक्‍टरी उत्पन्न 400 ते 500 क्विंटल हिरवा चारा व 125 ते 150 क्विंटल वाळलेला चारा मिळतो.अधिकतम कापण्या देणाऱ्या वाणांचे तीन कापण्यांपासून सरासरी हेक्‍टरी उत्पन्न 700 ते 800 क्विंटल हिरवा चारा व 200 क्विंटल वाळलेला चारा मिळतो.

फारुख रुबाब,

म.फु.कृ.वि, राहुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)