“वैभवलक्ष्मी योजने’साठी 56 लाख रुपयांची तरतूद

शेटफळगढे- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 2017-18 या वर्षात “वैभवलक्ष्मी कन्या कल्याण योजना’ राबविण्यासाठी जिल्ह्यासाठी 56 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य समितीने दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने वैभवलक्ष्मी कन्या कल्याण योजना राबविली जाते. स्त्री जन्माचे स्वागत करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत स्त्री जन्माचे स्वागत करून जन्मलेल्या मुलींच्या नावे दोन हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बनविले जाणार आहे. या योजनेअंतर्गत स्त्री जन्माचे कमी झालेले प्रमाण लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यामध्ये 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 539 उपकेंद्र व 13 पथक या ठिकाणी प्रसूती झालेल्या स्त्री अपत्याच्या नावाने दोन हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) बनविले जाते. या योजनेअंतर्गत सन 2016-17 या वर्षात 37 लाख 45 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला. तसेच सदर योजने साठी 2017-18 या वर्षाकरिता 56 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • असा मिळेल योजनेचा लाभ
    प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र व पथक या ठिकाणी स्त्री अपत्याचा जन्म झाल्यास संस्थे मार्फत जन्म नोंदीचा दाखला प्रमाणित करण्यात येईल. नवजात स्त्री अपत्याचे आधार कार्ड नोंद आणि जन्म दाखला नोंद प्राप्त करून घेणे. नवजात अपत्य, तसेच आई-वडिलांचे आधार कार्ड असणे आवश्‍यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देयक सादर केले जाणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत देयक पारित करून डिमांड ड्राफ्ट “पोस्ट मास्टर’ यांच्या नावाने पारित केला जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कागदपत्रांची पूर्तता व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत डिमांड ड्राफ्ट प्राप्त झाल्यानंतर पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून मुलीच्या नावे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बनविण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा कालावधी पाच वर्षांकरिता असून, परतावा रक्कम 2 हजार 953 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याला मिळणार आहे. प्रमाणपत्र बनविताना पालकास प्रमाणपत्राची मुदत मुलगी सज्ञान होईपर्यंत (18 वर्षे पूर्ण) मुदत वाढवून घेण्याविषयी समुपदेशन केले जाणार आहे. सदरची योजना कार्यरत करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी जबाबदार राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)