वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे केंद्र : कराड (भाग 1)

आनंद जगदाळे

पुणे-मुंबई बरोबर वैद्यकीय सुविधा देण्यात कराड अग्रेसर आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पाटण, खटाव, फलटण व सांगली जिल्ह्यातील वाळवा, इस्लामपूर, पलूस, कडेपूर, कडेगाव या परिसरातील लोक मोठ्या संख्येने येत असतात. वरील परिसरातील एखाद्या ठिकाणी मोठा अपघात झाला तर लोक कराड हेच मध्यवर्ती ठिकाण मानूून या ठिकाणीच येतात. कराड जशी एक मोठी बाजारपेठ आहे, त्याचप्रमाणे ते वैद्यकीय क्षेत्रातीलही एक मोठे केंद्र बनले आहे.

चांगले आरोग्य लाभावे, यासाठी प्रत्येकाचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभण्यासाठी त्या-त्या परिसरात आरोग्याच्या सुविधा असणे गरजेचे असते. लोकसंख्येच्या तुलनेत योग्य व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची पूर्तता होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते. राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कराडने वैद्यकीय क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांप्रमाणे वैद्यकीय सोयही एक मोठी गरज बनली आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय सोयीसुविधा नसतात, अशा ठिकाणी असलेले मागासलेपण सहजपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मलकापूर येथील कृष्णा रुग्णालय, कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल, वेणुताई चव्हाण रुग्णालय, श्री हॉस्पिटल, एकोपा क्‍लिनिक, गुजर हॉस्पिटल, गरुड हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, एरम हॉस्पिटल, क्‍लिअर स्किन हॉस्पिटल, चैतन्य बाल रुग्णालय, लाहोटी हॉस्पिटल, श्रेयस हॉस्पिटल, सीटी मेडिकल, पाटील हॉस्पिटल, कणसे हॉस्पिटल, बोधे हॉस्पिटल, गुरसाळे हॉस्पिटल, कोळेकर हॉस्पिटल, मोटे हॉस्पिटल, श्रीरत्न हॉस्पिटल, टकले हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल यासारख्या शेकडो हॉस्पिटल्सच्या माध्यमातून कराडमधील लोकांना वैद्यकीय सेवा मिळत आहे. कराड आता केवळ वैद्यकीय सेवा देण्याच्या क्षेत्रातच पुढे नाही तर कराडात अत्याधुनिक पध्दतीचे वैद्यकीय शिक्षणही उपलब्ध आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे केंद्र : कराड (भाग 2)

कृष्णा हॉस्पिटलची संजीवनी
1980 च्या दरम्यान मोठा अपघात झाल्यास किंवा एखादा दुर्धर आजार झाल्यावर रुग्णास तातडीने सांगली, मिरज किंवा पुणे, मुंबई या ठिकाणी न्यावे लागत असे. मात्र 1980 नंतर कराडमध्ये वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. वैद्यकीय क्षेत्राची मुहूर्तमेढ कराड मधीलच नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांनी रोवली. मात्र याला विस्तृत स्वरूप देण्याचे काम मलकापूर येथील कृष्णा रुग्णालय, कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल व वेणुताई चव्हाण रुग्णालय या तीन रुग्णालयांच्या माध्यमातून झाले. हळूहळू स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून कराडचे वैद्यकीय क्षेत्र विस्तारू लागले. विविध प्रकारच्या सुविधांबरोबर रुग्णांना योग्य व तत्पर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर होऊ लागला. साहजिकच पुणे-मुंबई या ठिकाणी मिळणारी सेवा कराडमध्ये उपलब्ध होऊ लागली. 1984 मध्ये मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाची व कृष्णा रुग्णालयची स्थापना झाली. या रुग्णालयाच्या माध्यमातून अपवाद वगळता सर्वच अत्याधुनिक सेवांची पूर्तता केला जाते. या ठिकाणी कराड व परिसरातीलच नव्हे तर सांगली, सातारा, रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर येथील रुग्णही मोठ्या प्रमाणावर येतात. मलकापूरच्या परिसरात व आगाशिवच्या डोंगर उताराला भकास असाच माळ होता, या माळरानावर जयवंतराव भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलची निर्मिती केली. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती ही जशी काळाची गरज आहे, तशी वैद्यकीय शिक्षणाची ही गरज असल्याने त्यांनी परिसरातच वैद्यकीय सुविधांचे जाळे पसरले. त्यांनी कृष्णा नर्सिंग स्कूल, बी. एस. सी. नर्सिंग कोर्स, पोस्ट लॉ बेसिक बी. एस. सी. नर्सिंग कोर्स, एम. एस. सी. नर्सिंग कोर्स, कृष्णा फिजिओथेरपी कॉलेज, कृष्णा फार्मसी, कृष्णा डेंन्टल कॉलेज, कृष्णा बायोटेक्‍नॉलॉजी आदी वैद्यकीय क्षेत्रातील कोर्सेसची सुरुवात केली. 1997 ला कॅन्सर विभागाची सुरुवात करून तो विभाग अत्याधुनिक करण्यात आला. 2005 ला कृष्णा

विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली केवळ वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोर्सेस प्रत्येक वर्षी या विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू असते. वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोर्सेस सुरू करण्याबरोबरच या विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनही सुरू असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)