“वेस्ट टू एनर्जी’ अयशस्वी होणार!

खासदार आढळराव पाटील : सत्ताधाऱ्यांना कचऱ्यातून संपत्ती हवीय!

पिंपरी – कच-याच्या खाली ‘मिथेन’ गॅस तयार होतो. त्यामुळे ती आग धूमसत आहे. उष्णता वाढत आहे. त्यामुळे मोशी येथील कचरा डेपोला आग लागणारच होती. त्यासाठी अगोदरच पालिकेने दक्षता घेणे गरजेचे होते. परंतु, पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आग लागण्यास पालिकेचे प्रशासन जबाबदार आहे. शहरातील सर्व कचरा एका ठिकाणी न आणता प्रभागातील कचरा प्रभागात जिरविणे आवश्‍यक आहे. “वेस्ट-टू एनर्जी’ प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही. आजपर्यंत तो प्रकल्प कुठेच यशस्वी झाला नाही. पालिकेने घाईघाईत वेस्ट-टू एनर्जी प्रकल्पाची निविदा काढली आहे. हा एक प्रयोगच होणार आहे, अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला गुरुवारी (दि.29) रात्री साडेसातच्या सुमारास आग लागली आहे. 24 तास होत आले तरी ही आग आणखीन धुमसत असून धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आज कचरा डेपोच्या आगीची पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख राम गावडे, शिवसेनेच्या शहरसंघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट उपस्थित होते. दरम्यान, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी आगीची माहिती दिली.

कच-याची समस्या दिवसेंदिवस अधिक उग्र होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधा-यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असून, त्यांना कच-याची विल्हेवाट लावायची नाही. तर, कच-यातून संपत्ती निर्माण करायची आहे. मोशीतील कचरा डेपोच्या आगीमुळे भोसरी परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. डेपोला आगी लागण्याच्या घटना रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलून या परिसरातील रहिवाशी नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी अधिका-यांना केल्या आहेत. तसेच, कचरा समस्या सोडविण्यासाठी जिथे कचरा निर्माण होतो तिथेच तो जिरविण्याची आवश्‍यकता आहे, असेही ते म्हणाले.

भ्रष्टाचारात सत्ताधाऱ्यांना तोड नाही…
पालिकेतील प्रशासन आणि सत्ताधारी केवळ भ्रष्टाचारात मग्न आहेत. केवळ निविदा काढण्याचे काम पालिकेत सुरु आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होते? हे पाहिले जात नाही. पिंपरी पालिकेला भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतात तोड नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत पालिकेची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. भ्रष्टाचाराची “पीएचडी’ केलेले सत्ताधारी आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा मोशीत आणून टाकला जातो. कच-याचे थरावर- थर लावले जात आहेत. माती टाकून कच-याचे थर रचले जात आहेत. कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरी व्यवस्था करणे गरजेचे आहे, असेही खासदार आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)