“वेस्ट टू एनर्जी’वरुन होणार “खल’

पिंपरी – “वेस्ट टू एनर्जी’ या तब्बल 208 कोटी 38 लाखांच्या महत्त्वांकाक्षी प्रकल्पावरुन दोन दिवसांत भाजपमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली. त्यातच आता विरोधकांनीही उद्या (दि.20) होणाऱ्या महासभेत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. त्यातच भाजपने नगरसेवकांसाठी आयोजित केलेले सादरीकरण रद्द केले. तसेच, थेट सभागृहातच “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मात्र, पक्ष प्रोटोकॉल बाजूला ठेवून पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्वपक्षीय नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठी काय कारवाई करणार? अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

सत्ताधारी भाजपच्या वतीने मोशी कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी हा 208 कोटी 38 लाखांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. याकरिता प्रति वर्षी एक रुपये एवढ्या नाममात्र दराने ठेकेदाराला 21 वर्षांकरिता जागा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. मात्र, सत्ताधारी भाजपातील अनेक नगरसेवकांना या प्रकल्पाची प्राथमिक माहिती नाही. शुक्रवारी होणाऱ्या महासभेतील विषयांची चर्चा करताना पक्ष बैठकीला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित असतानाच, भाजप नगरसेविका माया बारणे यांनी या विषयाबद्दल अधिक माहिती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, ही नाराजी दूर करण्यासाठी हा प्रकल्पाविषयी माहती जाणून घेण्यास इच्छूक असलेल्या नगरसेवकांसाठी गुरुवारी कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही कार्यशाळा होऊ न शकल्याने अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

सध्यस्थितीमध्ये मोशी येथील मनपाने स्व-खर्चाने तयार केलेल्या मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लॅन्टचे चालन, देखभाल व दुरुस्ती करणेसाठी मे. बी. व्ही.जी. इं. प्रा. लि. यांना प्रतिटन 385 रुपये आणि सॅनिटरी लॅन्डफिल देखभाल, दुरूस्तीसाठी 164 रुपये प्रतिटन दराने काम करण्यात येत आहे. अशाप्रकारे सध्यस्थितीला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रतिटन 559 रुपये खर्च केला जातो. “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाद्वारे सुमारे दीड वर्षांनंतरची परिस्थिती लक्षात घेवून प्रतिटन 528 रुपये खर्च करण्यात येणार आहेत.तरीही विरोधक आणि सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संबंधित प्रकल्पाला विरोध करीत आहेत, याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)