वेस्ट इंडीजचा श्रीलंकेवर 226 धावांनी विजय

मालिकेत 1-0 अशी आघाडी
पोर्ट ऑफ स्पेन – फिरकी गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिला कसोटी क्रिकेट सामना तब्बल 226 धावांनी जिंकताना वेस्ट इंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने नवोदित यष्टीरक्षक शेन डाऊरीच्या झुंजार शतकाच्या जोरावर 154 षटकांत 8 बाद 414 धावांवर आपला डाव घोषित केला होता. तर श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांसमोर जास्त काळ टिकाव धरु शकला नाही व त्यांना पहिल्या डावात 55.4 षटकांत सर्वबाद 185 धावांचीच मजल मारता आली. त्यावेळी वेस्ट इंडीजकडे 229 धावांची आघाडी होती, मात्र त्यांनी श्रीलंकेला फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आपला दुसरा डाव 7 बाद 223 धावांवर घोषित करून श्रीलंकेसमोर विजयासाठी 452 धावांचे लक्ष्य ठेवले.

या अशक्‍यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 226 धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर कुशल मेंडिसने एकाकी लढा देत 102 धावांची खेळी केली. मात्र वेस्ट इंडीजचे फिरकी गोलंदाज रोस्टन चेस आणि देवेंद्र बिशू यांच्या माऱ्यासमोर श्रीलंकेच्या इतर फलंदाजांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे श्रीलंकेला 226 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या फलंदाजांसोबतच त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यात यष्टीरक्षक शेन डाऊरीचने सर्वांना प्रभावित करत पहिल्या डावात नाबाद शतक झळकावून आपल्या मधील प्रतिभा सर्वांना दाखवून दिली. त्याने आपल्या खेळीत तब्बल 325 चेंडूंचा सामना करत 12 चौकारांसह नाबाद 125 धावांची खेळी करताना सामनावीर पुरस्कार पटकावला. तसेच मिगेल कमिन्स या नवोदित गोलंदाजाने श्रीलंकेच्या 3 फलंदाजांना बाद करत आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजच्या रोस्टन चेस आणि देवेंद्र बिशू या फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत त्यांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवले. रोस्टन चेसने केवळ 15 धावांत 4 बळी घतेले, तर बिशूने 48 धावांत 3 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. श्रीलंकेसाठी एकमेव सकारात्मक बाब अशी की, त्यांचा सलामीवीर कुशल मेंडिसला लय गवसली असून पुढील सामन्यांमध्ये त्याचा संघाला फायदा होण्याची शक्‍यता आहे,.उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना येत्या 14 जूनपासून ग्रॉस आयलेट येथील सेंट लुयिया येथे होणार आहे.

संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडीज पहिला डाव- 154 षटकांत 8 बाद 414 घोषित (शाइ होप 44, शेन डाऊरिच नाबाद 125, जेसन होल्डर 40, लहिरु कुमारा 95-4, सुरंगा लकमल 55-2), वेस्ट इंडीज दुसरा डाव- 72 षटकांत 7 बाद 223 घोषित (किरॉन पॉवेल 88, जेसन होल्डर 39, लाहिरू कुमारा 40-3, रंगना हेरथ 52-2) वि.वि. श्रीलंका पहिला डाव- 55.4 षटकांत सर्वबाद 185 (दिनेश चंडीमल 44, निरोशन डिकवेला 31, मिगेल कमिन्स 39-3, केमार रोच 34-2, शॅनॉन गॅब्रिएल 48-2), श्रीलंका दुसरा डाव- 83.2 षटकांत सर्वबाद 226 (कुशल मेंडिस 102, अँजेलो मॅथ्यूज 31, दिनेश चंडीमल 27, रोस्टन चेस 15-4, देवेंद्र बिशू 48-3).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)