वेसण गरजेची ठरतेय? (भाग-२)

वेसण गरजेची ठरतेय? (भाग-१)

फेसबुक, ट्विटर आणि गुगल या माध्यमांवर काही शब्दांचा वापर करून फिल्टर तयार करता येणे शक्‍य असते. या यादीतील एखादा शब्द जरी संदेशात दिसला, तरी तो संदेश “स्पॅम’ मानण्याचे काम सॉफ्टवेअर करते. अशा प्रकारच्या शब्दांचा वापर असलेला संदेश ज्याने पाठविला आहे, त्याला त्यातील खोटे किंवा संवेदनशील वगळण्याचा इशारा फेसबुककडून दिला जातो किंवा तसे शब्द डिलिट केले जातात. या प्रक्रियेत एकेका शब्दाचीच नव्हे तर पूर्ण वाक्‍याचीच पडताळणी करणेही शक्‍य असते. त्यामुळे आतापर्यंतचे हे सर्वांत चांगले तंत्रज्ञान मानले गेले आहे.

-Ads-

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग ज्या तंत्रज्ञानाच्या बळावर हा दावा करीत आहेत, त्याचे नाव आहे “आर्टिफिशियल इन्टेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स तंत्रज्ञानाने युक्त यंत्रे काही निकषांच्या आधारे स्वतःच निर्णय घेऊ शकतात. वैद्यकीय क्षेत्रापासून संरक्षणापर्यंत अनेक विषयांमध्ये या तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. त्याच तंत्रज्ञानाच्या आधारे फेसबुककडून खोट्या बातम्याना लगाम घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बातम्यांच्या विश्‍वासार्हतेची पडताळणी करणारे सॉफ्टवेअर फेसबुककडून विकसित केले जात आहे.

सोशल मीडियामुळे जगात संपर्काचे आणि मतप्रदर्शनाचे नवे दालन सुरू झाले हे खरे; परंतु त्याचा गैरवापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. डाटा चोरीपासून अफवा पसरविण्यापर्यंत अनेक गोष्टी या माध्यमातून घडत आहेत. त्या रोखण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी अमेरिकी कॉंग्रेससमोर सांगितले असले, तरी पूर्वीही त्यांनी तशी हमी दिली होती. परंतु आजअखेर कोणताही तोडगा शोधण्यास सोशल साइट्‌सना यश आलेले नाही. फेक न्यूजविरुद्ध जगभरात सुरू असलेल्या लढाईत भारतीय यंत्रणांनी सहभागी झाले पाहिजे.

नव्या सॉफ्टवेअरद्वारे बातम्यांचा स्रोत तपासण्यात येणार आहे. संदिग्ध शब्द किंवा वाक्‍ये असणारी बातमी एखाद्या अविश्‍वसनीय साइटकडून प्रसारित झाली असेल, तर अशा संदिग्ध मजकुराची शहानिशा हे सॉफ्टवेअर प्रचलित आणि प्रामाणिक वेबसाइटवरील किंवा डाटाबेसमधील मजकुराशी करेल. मजकुराला या साइट्‌सवरून पुष्टी मिळाली नाही, तर ती बातमी खोटी असल्याचे मानले जाईल आणि त्वरित डिलिट केली जाईल. अर्थात ही प्रणाली कितपत उपयोगी पडेल, हे पाहावे लागणार आहे. कारण जितक्‍या सहजपणे ही प्रक्रिया मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितली, तितकी सरळसोपी ती निश्‍चितच नाही. परंतु तरीही आकलनाच्या आधारे असे मानता येईल की, जर ही यंत्रणा सक्षम ठरली तर पुन्हा एकदा सकारात्मक विश्‍व सोशल मीडियाच्या माध्यमातून साकारण्याचा रस्ता खुला होऊ शकेल.

दुसरीकडे खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्यांना आवर घालण्यासाठी सरकारनेही कंबर कसली आहे. अफवा पसरविल्या गेल्यास जगभरातील मोठ्या सोशल साइट्‌स आणि आयटी कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपन्यांना जबाबदार मानून कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा साइट्‌सवरूनच खोट्या बातम्या पसरविल्या गेल्यामुळे मॉब लिंचिंगच्या अनेक घटना देशात घडल्या असून, त्यात अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. अशा सोशल साइट्‌सवरील बातम्यांमुळे जर हिंसा झाली तर या कंपन्यांच्या भारतातील प्रमुखाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे सरकारने सोशल साइट्‌सना सुनावले आहे.

भारतात खोट्या बातम्यांचा प्रसार 2016 मध्ये सर्वाधिक झाल्याचे दिसते. अशा फेक न्यूज केवळ पसरविल्याच गेल्या असे नाही, तर त्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या. अनेकजण या अफवांना बळी पडल्याचे समोर आले. पूर्वी “कानगोष्टी’ हेच अफवा पसरविण्याचे एकमेव माध्यम होते. आता व्हॉट्‌स अॅप आणि फेसबुकसारखी साधने समाजकंटकांच्या हातात आहेत. काही इतक्‍या चुकीच्या बातम्या पसरविल्या गेल्या आहेत की अनेक संस्थांना आणि अस्थापनांना माध्यमांसमोर येऊन खुलासे करावे लागले आहेत. परंतु फेक न्यूज ही अशी डोकेदुखी बनली आहे, जी एकाच वेळी घाऊक प्रमाणावर नष्ट करणेही सोपे राहिलेले नाही.

– गणेश काळे (संगणकतज्ज्ञ)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)