फेसबुकवरून खोटी बातमी व्हायरल झाल्याच्या प्रकरणात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतेच अमेरिकी कॉंग्रेसला असे सांगितले आहे की, अशी प्रकरणे फेसबुक कंपनीकडून अत्यंत गांभीर्यपूर्वक हाताळली जात असून, अशा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कंपनी जबाबदारीने काम करीत आहे.
वस्तुतः फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि अन्य सोशल साइट्सची सॉफ्टवेअर आल्यापासून एकीकडे त्यांचा अत्यंत सकारात्मक उपयोग केल्याच्या असंख्य घटना दिसून येत आहेत. परंतु काही हितसंबंधी लोक अत्यंत वाईट पद्धतीने या माध्यमांचा वापर करतात, असेही दिसून आले आहे. कोणत्या गोष्टीचा फायदा कसा घ्यायचा, हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते आणि सोशल साइट्स हे माध्यम आता प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रत्येकाला ज्या प्रकारे याचा वापर करावासा वाटतो, तसा तो केला जातो आणि त्यातून कधीकधी अत्यंत भयावह प्रसंग उद्भवतात.
गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरून अफवा पसरविण्याचे इतके अमाप पीक आले आहे की, अनेकदा लोक खोट्या बातमीलाच वास्तव मानतात आणि त्याबरहुकूम वागतातही. केवळ भारताच्या संदर्भात जरी आपण अशा घटनांचा विचार केला तरी या मानसिकतेचे दुष्परिणाम सातत्याने समोर येताना दिसत आहेत. काही समाजकंटक किंवा हिणकस राजकारण करणाऱ्या व्यक्ती देशात नकारात्मक वातावरण पसरवू पाहत आहेत आणि त्यासाठी खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. केवळ अशिक्षित लोकच नव्हे तर चांगले शिकले-सवरलेले आणि समजूतदार लोकही अशा अफवांना बळी पडू लागल्याचे अनेकदा समोर आले आहे.
सोशल मीडियामुळे जगात संपर्काचे आणि मतप्रदर्शनाचे नवे दालन सुरू झाले हे खरे; परंतु त्याचा गैरवापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. डाटा चोरीपासून अफवा पसरविण्यापर्यंत अनेक गोष्टी या माध्यमातून घडत आहेत. त्या रोखण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी अमेरिकी कॉंग्रेससमोर सांगितले असले, तरी पूर्वीही त्यांनी तशी हमी दिली होती. परंतु आजअखेर कोणताही तोडगा शोधण्यास सोशल साइट्सना यश आलेले नाही. फेक न्यूजविरुद्ध जगभरात सुरू असलेल्या लढाईत भारतीय यंत्रणांनी सहभागी झाले पाहिजे.
काही दिवसांपूर्वी दोन तरुणांचे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आले होते आणि ते चोर आहेत, असे पसरविले गेले होते. एके ठिकाणी त्या दोघांना लोकांनी ओळखले आणि कोणतीही खातरजमा न करता किंवा पोलिसांना माहिती न देता जमावाने त्या दोघांना ठेचून ठार मारले. प्रकरणाची चौकशी झाली, त्यावेळी ते दोघेही निर्दोष होते, हे समोर आले. अगदी ते दोघे खरोखर दोषी असते असे मानले, तरी त्यांना थेट शिक्षा देण्याचा अधिकार जमावाला दिला कुणी? या दोघांना पोलिसांच्या हवाली करून, रीतसर तक्रार नोंदवून संशय खरा की खोटा हे तपासता येणे शक्य होते. अशा प्रकारच्या “मॉब लिंचिंग’च्या घटना आपल्या देशात सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. काही लोक तर इतिहासातील प्रसंगांची मोडतोड करून धादांत असत्य बाबी सोशल मीडियावरून पसरवीत असतात. त्यापेक्षा अधिक दुःखद बाब म्हणजे, शिकले-सवरलेले लोक कोणतीही शहानिशा न करता अशा बाबी “फॉरवर्ड’ करताना दिसतात. जेव्हा लोक अशा धादांत खोट्या गोष्टी खऱ्या मानू लागते, तेव्हा समाजाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत असते. असत्य गोष्टींचा प्रचार अतिप्रमाणात झाल्यास एक वेगळाच भ्रम समाजात पसरत जातो. म्हणूनच या कारणामुळेच, नेमकी कोणती बातमी खरी, हे शोधण्याचे तंत्र आपल्याला साध्य करावेच लागेल.
– गणेश काळे (संगणकतज्ज्ञ)
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा