वेळे हद्दीतील पाझर तलावाला दुरुस्तीची प्रतिक्षा

गळती अन्‌ दुरुस्तीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर

धनंजय घोडके

वाई –
वाई तालुक्‍यातील वेळे गावच्या हद्दीत असणाऱ्या पाझर तलावाची गळती अन्‌ गाळ साचल्यामुळे दयनीव अवस्था झाली आहे. गाळामुळे आणि गळतीमुळे तलावात अत्यल्प पाणीसाठा होत असल्याने पावसाळ्याबरोबरच तलावातील पाणीसाठा लुप्त होत आहे. त्यामुळे पाझर तलाव असतानाही केवळ गाळ आणि गळती काढली जात नसल्यामुळे वेळेसह परिसरातील जनतेचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दरवर्षीच गंभीर बनत आहे. मात्र, प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेळे, ता. वाई परिसरातील पाझर तलाव गेल्या अनेक वर्षांपासून त्याची गळतीच न काढल्याने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात पाणी साठविण्याचे साधन म्हणून या पाझर तलावाकडे पाहिले गेल्याने तलावाची बिकट अवस्था झाली आहे. वेळे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते.

तीन हजाराहुन अधिक लोकसंख्ये असलेले वेळे हे गाव तालुक्‍याच्या राजकारणाची दिशा ठरविणारे गाव म्हणूनही ओळखले जाते. मात्र, याच गावाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने सध्या तरी दुर्लक्ष केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेसह परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. पावसाळ्यानंतर दोन-तीन महिन्यांपासूनच परिसरात पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण होता. कदाचित त्या पार्श्‍वभूमीवरच वेळे येथे पाझरतलावाची निर्मिती करण्यात आली.

पाझर तलावामुळे ग्रामस्थांचा पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात का होईना सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, तलावाच्या उभारणीनंतर अद्यापपर्यंत एकदाही या तलावातील गाळ काढण्यात आलेली नाही, शिवाय तलावाला लागलेल्या गळतीकडेही प्रशासनासह गावपुढारी अन्‌ लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना दरवर्षीच उन्हाळ्याच्या आधीपासून पावसाळा सुरु होईपर्यंत पाण्यासाठी वणवण करावे लागते.

मार्चनंतर या गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याने या भागातील तलावाकडे गांभीर्याने लक्ष देवून दुरुस्ती केल्यास या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो, परंतु पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे वेळे गावाचा संपूर्ण परिसर वेठीस धरला जात असल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मुळातच दुष्काळी पट्ट्यात हे गाव येत असून दुष्काळामुळे या परिसरात पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर या गावातील पाझर तलावावर अवलंबून आहे.

ग्रामस्थांची सुरु आहे फरफट
पाण्याअभावी वेळे गावाची सध्या फरपटच सुरु आहे. त्यामुळे या तलावाची दुरुस्ती केल्यास गावाचा व परिसरातील शेतीचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघेल. सध्या तलावात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने परिसरातील पशु-पक्षी, जनावरे व इतरही काही वन्यजीव पाण्यासाठी दाहीदिशा भटकताना दिसतात. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतामुळे पाझर तलावांची दुरुस्ती न होता या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले खिसे भरण्यातच धन्यता मानली. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपायांचा निधी वाया गेला आहे. तरीही कोणताही वरिष्ठ अधिकारी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने वेळे गावाच्या परिसरातील शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पाण्याअभावी विकासाला खीळ
गावाच्या हद्दीत शासन कंपनी उभारणीसाठी औद्योगिक वसाहती निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून पाण्याअभावी या भागातील विकासाला खीळ बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला या परिसरात खीळ बसली आहे. पावसाळ्यात पडणारे लाखो लिटर पाणी निव्वळ नियोजनशुन्य कारभारामुळे वाहून जाते. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पाझर तलाव दुरुस्ती कामात लक्ष घालून चांगल्या प्रतीचे दुरुस्तीचे काम व्हावे अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.
 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)