चिंबळी-चिंबळी फाटा ते चिबंळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबावर वेली झपाट्याने वाढू लागल्या आहेत. या वेली थेट विद्युत तारांपर्यंत पोहचल्या आहेत. हिरव्या ओल्या वेलीतून विद्युत प्रवाह वाहू शकत असल्यामुळे तो खाली उतरून धोका निर्माण झालेला आहे. महावितरणचे या धोकादायक वाढलेल्या वेलींकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चिंबळीफाटा ते चिबंळीगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक विद्युत खांब आहेत. या भागात वीजपुरवठा करणाऱ्या या खांबांना सध्या वेलींनी वेढलेले दिसत आहे. वेलींनी खांबांला पूर्णपणे वेढा दिला आहे. त्यामुळे खांब असल्याचे जाणवतदेखील नाही. फक्त त्यावर तारांमुळे येथे खांब असल्याचे जाणवते. या वेली वाढत जाऊन थेट तारांपर्यंत पोहोचल्या असल्याने शॉर्टसर्किट होऊन या भागातील वीजपुरवठादेखील खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याने नागरिकांची ये-जा सुरू असते, त्यातच एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच येथे वाढणाऱ्या वेली काढून टाकण्याची तसदी महावितरणने घेतली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा