कैलास लेणे आणि वास्तुशास्त्र

आजकाल वास्तुशास्त्र या विषयावर बरंच लिहिलं आणि बोललं जातंय. पण जगात अशा काही जागा आहेत जिथे या संज्ञा तोकड्या पडतात. त्यापैकीच एक वेरूळ येथील कैलास लेणे.

अद्भुत लेणं

वास्तुशास्त्र असो अथवा वास्तुरचनाशास्त्र, दोन्हींचा उद्देश वास्तुनिर्मिती हाच असतो. निर्मिती म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर बांधकाम चालू असलेली एखादी इमारत येते. परंतु एखाद्या शिल्पाप्रमाणे घडवलेली वास्तू असू शकते यावर तुमचा विश्वास बसेल का? अलौकिक वातावरण निर्मिती साधणारी, अविश्वसनीय बांधकाम केलेली, आधुनिक तंत्रज्ञानाला अचंबित करणारी आणि अविस्मरणीय अनुभव देणारी एकमेवाद्वितीय वास्तू म्हणजे वेरूळ येथील कैलास लेणे. इथे फक्त स्तिमित होता येतं. वास्तूशास्त्र, अभियांत्रिकी वगैरे संज्ञा क्षुल्लक वाटतात आणि त्या अद्भुत वातावरणात चक्क हरवून जायला होतं. एका अखंड पाषाणातून (पाषाण पेक्षा डोंगर म्हणणं अधिक योग्य- मोनोलिथिक) कोरलेली ही वास्तू जगातील काही एकपाषाण वास्तूंपैकी एक आहे. फक्त छीन्नी आणि हातोडा वापरून 7000 कारागिरांनी जवळजवळ 150 वर्षे हे कोरीव काम केलं आहे. आठव्या शतकात राष्ट्रकुट कुळातील राजांच्या काळात याची निर्मिती झाली. येथील एकूण 34 लेण्यांपैकी सोळाव्या क्रमांकाचं लेणं हे कैलास मंदिर म्हणून ओळखलं जातं. वरपासून सुरुवात करून खालपर्यंत कोरून काढलेलं हे मंदिर पाहणं हा अतिशय सुंदर अनुभव आहे.

या लेण्याची साधारणपणे मोजमापं 300 फूटु 175 फूट अशी आहेत. मुख्य प्रवेशद्वार म्हणजे एक गोपूर आहे. इथून आत प्रवेश करताच आपण इंग्रजी ‘ण’ आकाराच्या अंगणात येतो. या अंगणाच्या कडेनी 3 माजली खांबांवर आधारलेला मार्ग आहे. त्याच्याच बाजूनी कोनाड्यात बसवल्यासारख्या सुंदर शिल्पकृती आहेत. अंगणाच्या मध्यभागी शंकराचे मंदिर आहे. या मंदिराच्या कडेच्या मार्गिकेला जोडणारे दगडी पूलही होते, जे आता अस्तित्वात नाहीत. मंदिरावरील कोरीव काम केवळ अद्वितीय. मुख्य मंदिराच्या खांबांवरील कोरीवकामही सुंदर आहे. इतकेच नव्हे तर मंदिराच्या जोत्यावर कोरलेले हत्तीही सुबक आहेत. जणू या हत्तींनी हे मंदिर आपल्या पाठीवर तोलून धरले आहे. याव्यतिरिक्त अजून पाच लहान आकाराची मंदिरं आहेत. त्यापैकी तीन आपल्या प्रमुख नद्यांना समर्पित आहेत – गंगा, यमुना आणि सरस्वती. मंदिराचे शिखर द्राविडी (दक्षिण भारतीय) पद्धतीचे आहे.

मंदिराच्या बाजूच्या अंगणात दोन सुंदर ध्वजस्तंभ आहेत. सगळ्या शिल्पकलेचे मूळ हे हिंदू धार्मिक व सांस्कृतिक चिन्हं हाच आहे. दक्षिणेकडील भिंतीवर रामायण महाभारतातील कथा तसेच इतर भिंतींवर शंकर पार्वतीच्या पुराणकथांमधील प्रासंगिक प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिरासमोरील लहान मंडपात नंदी आहे तर अंगणात डाव्या बाजूला एक हत्ती. सगळीकडे पवित्र समजल्या जाणाऱ्या गोष्टी कोरून निर्माण केल्या आहेत. खरंच या वास्तूला लेणं हेच विशेषण शोभून दिसतं.इतकं संशोधन होऊनही अजून कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच आहेत. मुळात इतकं मोठं खोदकाम करणारे हे नेमके कोण लोक होते? हेच अजून समजलेलं नाही. राष्ट्रकुट राजांनी हे काम केलं तर तसा कुठेच, कसलाच उल्लेख कसा नाही? एखादा शिलालेख सुद्धा मिळत नाही. तसेच या निर्मितीचा मुख्य उद्देश काय, हेही अजून माहित नाही. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यासाठी यांनी कुठली गणितं मांडली? आराखडे कसे बनवले? की बनवलेच नाहीत? मग खोदकाम सुरु कुठे करायचं आणि थांबायचं कुठे हे कोणी ठरवलं? अभियांत्रिकीचा कस लागेल असं हे काम कोणती तंत्र, यंत्र आणि शास्त्रं वापरून केलीत? कारण पाण्याचा निचरा होण्यासाठी पाठीमागच्या पाषाणात जी भोकं केली आहेत ती कोणत्याही यंत्राशिवाय फक्त हातांनी करणं अशक्‍यप्राय आहे. शिवाय अंतर्गत भागात जिथे दिवसाही सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तिथे इतकं रेखीव कोरीवकाम करताना प्रकाशयोजना कशी केली असेल? आरशांच्या सहाय्यानी प्रकाश आतपर्यंत पोहोचवला असेल असा एक तर्क आहे. सर्वात आश्‍चर्य याचं वाटतं कि एवढा प्रचंड डोंगर फोडताना जो लाखो टन फोडलेला दगड निघाला असेल त्याचं या लोकांनी केलं तरी काय? तो दगड या जागेवरून हलवायलाच किती मजूर लागले असतील? सगळंच आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आपण अडकून पडलोय पूर्व- पश्‍चिम – उत्तर – दक्षिण मधे. वास्तूशास्त्र मानावं कि रचना आधुनिक करावी असल्या प्रश्नांमधून आपल्याला बाहेर पडता येईल कि नाही, कोणास ठाऊक? चार भिंती आणि छप्पर असलेल्या वास्तूत आपण शांती शोधत बसलोय. रचना, शास्त्र, गरजा, खर्च यांची गोळाबेरीज करूनही समाधान तर मिळतच नाहीये. पण त्यांनी जी काही शास्त्र वापरून शेकडो वर्षांपूर्वी हे मंदिर निर्माण केलं तिथे आजही दैवी अनुभव येतो, शांततेची, समाधानाची जाणीव होते. कारण तिथे या कारागीरांच्या प्रामाणिकपणाचे, समर्पणाचे, कष्टांचे आणि कौशल्याचे पडसाद उमटलेले आहेत. त्यांनी फोडलेला दगडही भावना जागवतो. कसली शास्त्रं आणि कसली रचना? इथे असले शब्द अतार्किक, असंबद्ध वाटतात. उरतो तो फक्त मनावर कायमचा कोरला जाणारा अनुभव.

समिरा गुप्ते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)