#वेध: विचारवंतांच्या हत्या : पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण? 

अशोक सुतार 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने अटक केली असल्याने तपासाला निश्‍चित दिशा मिळाली आहे. तपास यंत्रणेने एवढ्यापुरते सीमित न राहता याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा आहे. 
पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या पाच वर्षांपूर्वी झाली होती. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह देशभर उमटले. त्यानंतर पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्ते एम. एम. कलबुर्गी, बेंगळुरूमधील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. विशेष म्हणजे ज्यांची हत्या झाली ते सर्वच जण डाव्या विचारसरणीचे होते. अंधश्रद्धा, जुन्या रूढी, धर्मांधता याविषयी जनजागृती करत होते. या डाव्या विचारवंतांना नाहीसे केले तर आपली “दुकानदारी’ तेजीत सुरु होईल, या उद्देशाने या हत्या करण्यात आल्या. पण मारेकरी व त्यांच्या सूत्रधारांना कल्पना नाही की, व्यक्तीला मारून त्यांचे विचार संपत नाहीत. ते विचार समाजात अधिकाधिक खोलवर जातात.
दाभोलकर यांच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रासह देशात उमटले. या घटनेने समाज हादरून गेला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, नंतर तीन विचारवंतांची हत्या झाली, हे सर्व गेल्या पाच वर्षात घडले, या विचारवंतांच्या मारेकऱ्यांचा नीट सुगावा लागत नसल्यामुळे समाजात अस्वस्थता पसरली होती. तसेच डाव्या विचारांची चळवळ पुढे सुरू राहण्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. थोडक्‍यात, भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना विचार करण्याच्या, मांडण्याच्या व्यक्‍तिस्वातंत्र्यावर गदा आली. आता डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी सापडले, आता यातूनच काही हत्यांचा तपास लागेल अशी आशा वाटते.
नरेंद्र दाभोलकर 20 ऑगस्ट 2013 रोजी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी संभाजी उद्यानामध्ये गिेले होते. उद्यानामध्ये फिरून परत जात असताना 7 वाजून 20 मिनिटांनी ते ओंकारेश्‍वर पुलाजवळ आल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला. मारेकऱ्यांनी एकूण पाच गोळ्या डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. फायरिंगच्या घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले.
घटनास्थळी पुणे पोलिसांनी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेऊन दुचाकी व हल्लेखोरांची माहिती घेण्याची प्रक्रिया राबवली. सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. गुन्हे शाखेची तपास पथके राज्यात अनेक ठिकाणी रवाना झाली सीसीटीव्हीच्या फुटेजवरून काढलेल्या संशयितांच्या रेखाचित्रावरून पोलिसांनी अनेकांची चौकशी केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई, लंडनला पाठविण्यात आले, आठ कोटी फोन कॉल्ससह ई-मेलची तपासणी पोलिसांनी केली. दि. 2 सप्टेंबर रोजी बॅलेस्टिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी सुमारे 17 जणांची चौकशी केली. या तपासाद्वारेच दि. 19 डिसेंबर 2013 रोजी मनिष नागोरी व खंडेलवाल यांना संशयित म्हणून पकडले. दि. 16 जानेवारी 2014 रोजी गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरू झाला. तपासात प्रगती होत नाही, हे पाहून एसआयटीची स्थापना करून गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.
सुमारे दोन वर्षे उलटल्यानंतर मात्र डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सुपुत्र डॉ. हमीद दाभोलकर हे मुंबई उच्च न्यायालयात गेले व हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सी.बी.आय.) सोपविण्यात आले. दि. 31 मे 2016 रोजी डॉ. विरेंद्र तावडे व सारंग अकोलकर यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले. विरेंद्र तावडेला अटक करण्यात आली. तावडे हा मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयने दावा केला. तावडेचा मडगाव व मिरज दंगलीतही हात होता, असा संशयही सीबीआयने व्यक्त केला. सीबीआयकडून पुणे कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.
सन 2017 मध्ये सारंग अकोलकर व विनय पवार हे फरार झाले. गौरी लंकेश हत्येप्रकरणी मे 2018 मध्ये अमोल काळेला पुण्यातून अटक करण्यात आली. काळेकडील वैभव राऊतचा उल्लेख असणारी डायरी सीबीआयने जप्त केली. यानंतर तपासाला वेग आला. त्याच्या डायरीत राज्यातील 36 जण हिटलिस्टवर असल्याचे निष्पन्न झाले. नालासोपारा, मुंबई येथून हिंदुत्ववादी संघटनेचा वैभव राऊत याच्याकडे मुंबई एटीएसला शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार 10 ऑगस्ट रोजी त्याच्या घर व दुकानात छापा टाकला असता तेथून 10 पिस्टल बॅरल, 6 अर्धवट तयार केलेल्या पिस्टल बॉडी, 3 अर्धवट मॅग्झीन, 7 अर्धवट पिस्टल स्लाईड, 16 रिले विथ स्मिथ मिळून आले. याच दिवशी साताऱ्याच्या सुधन्वा गोंधळेकर, शरद कळस्करलाही अटक करण्यात आली. दि. 12 ऑगस्ट रोजी सुधन्वा गोंधळेकरकडून बंदूक व पिस्तूल जप्त करण्यात आली. पुणे एटीएसने दि. 14 ऑगस्ट रोजी सुधन्वाच्या साताऱ्यातील घरावर छापा टाकला. या छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे व नोंदी आढळल्या. कोडवर्डमध्ये असलेले संदेशही जप्त करण्यात आले. त्याच दिवशी एटीएसने सचिन अंदुरेला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केली. दि. 16 ऑगस्ट रोजी अंदुरेला पुन्हा चौकशी करून सोडले. त्याच दिवशी रात्री सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर सचिन अंदुरे हा प्रत्यक्ष कटात सामील असल्याचा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात रविवारी दि. 19 ऑगस्ट 2018 ला केला. त्याला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे दिले होते. याबाबत तपास करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. डॉ. दाभोलकर हे “अंनिस’च्या माध्यमातून हिंदू परंपरेविरोधात बोलत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांना त्यांना संपवायचे होते. त्यासाठी डॉ. दाभोलकर यांचा दिनक्रम काय होता, या सर्व बाबींची माहिती हत्येची कबुली शरद कळसकरने दिली होती. यामध्ये गोंधळेकरने कळसकरला डॉ. दाभोलकर यांच्या “रेकी’साठी मदत केली असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने अटक केली असल्याने तपासाला निश्‍चित दिशा मिळाली आहे.
तपास यंत्रणेने एवढ्या पुरते सीमित न राहता यामागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, त्याच्यापर्यंत पोहोचावे, अशीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)