वेतनासाठी 5 तारखेची ‘डेडलाईन’

विलंब झाल्यास कारवाई होणार : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिलासा

पुणे – जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या 5 तारखेपर्यंत करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. वेतनास विलंब झाल्यास संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गाचे हजारो कर्मचारी काम करतात. या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याची जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची आहे. मात्र गेल्या काही दिवसांचा अनुभव पाहता कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत नसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दि. 5 तारखेच्या आत वेतन होणे आवश्‍यक आहे, असे स्पष्ट आदेश मांढरे यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत. वेळेत वेतन होण्यासाठी संबंधित खातेप्रमुखांनी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्‍तीश: काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

एवढेच नव्हे, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्याशिवाय वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे अथवा अधिकाऱ्यांचे वेतन करू नये. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतरच खातेप्रमुख व अधिकाऱ्यांचे वेतन करा, अशी तंबीही मांढरे यांनी वेतन करणाऱ्या खातेप्रमुखांना दिली. त्यामुळे वेतन अदा करणाऱ्या खातेप्रमुखांपुढे वेळीच वेतन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या प्रक्रियेची वेळापत्रकत तयार करून, त्यानुसार सर्व वेतन दि. 5 तारखेच्या आत होतील, याची दक्षता घ्यावीत. वेतन देण्याबाबत विलंब होत असल्यास, ती बाब तातडीने निदर्शनास आणून द्यावीत. यापुढे कोणत्याही कारणास्तव वेतनास विलंब झाल्याचे निदर्शनास येताच, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विलंब प्रतिबंध कायद्यान्वे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)