अग्रलेख | वेड्यांचे शहाणपण

गेल्या सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट होईल आणि त्यांच्यात चर्चा होईल, असे कुणी म्हटले असते, तर त्यावर कुणी विश्‍वास ठेवला नसता; परंतु राजकारण हा तर्क, अतर्काचा खेळ असतो. तिथे कधी काय घडेल हे सांगता येत नाही. ट्रम्प व किम हे दोघेही विक्षिप्त. दोघांचाही स्वभाव तापट. अशा दोन लोकांनी एकत्र येऊन जगाला शहाणपणाचा धडा द्यावा, यासारखा दुसरा विनोद नाही; परंतु तो घडला खरा! किम दररोज अण्वस्त्रांच्या आणि क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घ्यायचे आणि थेट “अमेरिका आपल्या क्षेपणास्त्रांच्या कह्यात आली,’ असे सांगायचे; तर ट्रम्प कोरियाला जगाच्या नकाशावरून हटवण्याची भाषा करायचे.

भारत आणि उत्तर कोरियात गेल्या 69 वर्षांपासून राजनैतिक संबंध असले, तरी त्यात उतार व चढ कायम येत गेले. उत्तर कोरियाला चीन, रशियाने पुरवलेले अण्वस्त्र तंत्रज्ञान पाकिस्तानला दिल्याचा भारताचा संशय आहे. त्यामुळे गेल्या दोन दशकांत दोन्ही देशांत फारशी चर्चा झाली नाही. उत्तर कोरियात कोळस बॉक्‍साईट व अन्य खजिनांचे साठे आहेत. ट्रम्प व किम यांच्यातील चर्चेनंतर तेथील बंधने उठली, तर भारताला उत्तर कोरियाशी व्यापार वाढविता येईल. उत्तर कोरिया हा भारतासाठी एक चांगली बाजारपेठ होऊ शकते.

हे दोघे एकीकडे उद्दामपणाची, दुसऱ्याला धडा शिकविण्याची भाषा करीत असताना, दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मून हे मात्र सामंजस्याची भूमिका घेत होते. त्यांनी उत्तर कोरियाशी चर्चेची तयारी दाखविली. स्थानिक जनतेचा विरोध डावलून किम यांना चर्चेसाठी तयार केले. दुसरीकडे, क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे उत्तर कोरियावर कडक निर्बंध घालण्यात आले. तिसरीकडे चीनकडून उत्तर कोरियाला मिळणारी छुपी मदत रोखण्यात आली. या सर्वांमुळे उत्तर कोरियाची कोंडी झाली होती. तेथील जनता उपासमारीने व अन्य प्रश्‍नांनी त्रस्त असताना क्षेपणास्त्र व अण्वस्त्रांच्या चाचण्या त्यांच्या पोटाची खळगी भरू शकत नव्हती. त्यामुळे स्थानिक उद्रेकही व्हायला लागला होता. किम यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. चीनला जगाची महासत्ता व्हायची घाई झाल्याने त्याने मित्राला फार मदत करता येणार नाही, अशी भूमिका घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका देशापेक्षा चीनला जगातील अन्य देश जास्त महत्त्वाचे वाटले. अशा स्थितीत मून व किम यांच्यात भेट झाली. दोन्ही कोरियातील गेल्या 65 वर्षांच्या पोलादी भिंती गळून पडल्या. त्या भेटीतूनच ट्रम्प व किम यांच्या भेटीचा मार्ग खुला झाला; परंतु आता तिचा सर्वांनाच विसर पडला. ट्रम्प व किम यांची भेट ठरल्यानंतरही अमेरिकेच्या काही उत्साही अधिकाऱ्यांनी आपल्या आगलाव्या वक्तव्याने अडचण निर्माण केली. त्यामुळे उत्तर कोरियाने भेटच रद्द करण्याचा इशारा दिला. एवढे होऊनही ट्रम्प यांच्या वकिलाने अकलेचे तारे तोडले. किम यांनी कशी नाक घासत माफी मागितली, गुडघ्यावर बसून ट्रम्प यांच्यापुढे कशी शरणागती पत्करली, असे सांगितले. कोणताही मानी अध्यक्ष असे करणार नाही, हे जग जाणते. त्यातही किम यांच्यासारखा हुकूमशहा तर कधीच करणार नाही. यापूर्वी किम यांनी अनेकांना तोफाच्या तोंडी दिले. कित्येकांच्या हत्या केल्या. तापट डोक्‍याच्या किम यांनी तरीही या वेळी विवेक सोडला नाही.

या पार्श्‍वभूमीवर, दोघांत चर्चा झाली. ट्रम्प व किम यांच्यात सिंगापूरमध्ये झालेली शिखर परिषद आणि दोघांनी त्यानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया जगाची चिंता कमी करणारी आहे. जागतिक शांततेसाठीचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. उभय नेत्यांच्या निवेदनातून ठोस हाती लागत नसले, तरी पुन्हा भेटण्याचे दोघांचे संकेत, अविश्‍वासाचे मळभ दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. उत्तर कोरियातील बेरोजगारी, उपासमार ते आर्थिक आणि औद्योगिक मागासलेपण किम यांना भेडसावत आहे. त्यावर तोडगा निघायला यामुळे मदत होईल. उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाला पूर्णविराम देण्याचे किम यांनी मान्य केले असे, तरी ते प्रत्यक्षात कसे येणार आणि त्याच्या पावलाबद्दल दक्षिण कोरिया व जपानची प्रतिक्रिया काय असेल, यावर सारे अवलंबून आहे. त्याचे कारण जपान व उत्तर कोरियाच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेवर असून या दोन राष्ट्रांचे समाधान हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ट्रम्प यांना आपल्या पूर्वीच्या अध्यक्षांनी केलेली सर्व कामे मोडीत काढून आपणच काहीतरी करून दाखवितो, हे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते.

“ओबामा केअर’, तेल अव्हिव्हला राजदूताच्या शहराचा दर्जा, इराणबरोबरचा करार रद्द करणे, जी-7 देशांच्या परिषदेत वादग्रस्त विधाने करणे, ही ट्रम्प यांची वैशिष्ट्ये पाहिली, तर त्यांचा योग्य मार्ग कोणता, हा प्रश्‍न पडू शकतो; परंतु ओबामा यांच्यापेक्षाही जगात शांतता आपणच निर्माण करू शकतो आणि शांततेच्या नोबेल पुरस्कारावर आपलाच हक्क आहे, हे दाखविण्याची घाई त्यांना झाली आहे. त्यासाठी किम यांच्याबरोबरची चर्चा यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी करणे क्रमप्राप्तच होते. भारत आणि उत्तर कोरियात गेल्या 69 वर्षांपासून राजनैतिक संबंध असले, तरी त्यात उतार व चढ कायम येत गेले. उत्तर कोरियाला चीन, रशियाने पुरवलेले अण्वस्त्र तंत्रज्ञान पाकिस्तानला दिल्याचा भारताचा संशय आहे. त्यामुळे गेल्या दोन दशकांत दोन्ही देशांत फारशी चर्चा झाली नाही. उत्तर कोरियात कोळस बॉक्‍साईट व अन्य खजिनांचे साठे आहेत. ट्रम्प व किम यांच्यातील चर्चेनंतर तेथील बंधने उठली, तर भारताला उत्तर कोरियाशी व्यापार वाढविता येईल. उत्तर कोरिया हा भारतासाठी एक चांगली बाजारपेठ होऊ शकते. दक्षिण कोरिया, जपान व उत्तर कोरिया एकत्र आले, तर पूर्व आशियात भारताचे स्थान मजबूत होऊन चीनच्या चिनी समुद्रातील वर्चस्वालाही शह बसू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)