वेटरच्या मुलाला दहावीत 96.20 टक्के गुण

सविता रमेश फिरोदिया प्रशाला ः राजेश चौधरीची चमकदार कामगिरी

नगर – आई-वडील करीत असलेल्या काबाडकष्टांचे चीज होण्यासाठी अनेक मुलेही तितक्‍याच तन्मयतेने अभ्यास करून घवघवीत यश मिळवतात. नगरमधील महेंद्र पेडावाला रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या विश्‍वजित चौधरी यांच्या मुलानेही आपल्या वडिलांचे श्रम सार्थकी लावत दहावीच्या परीक्षेत तब्बल 96.20 टक्के गुण मिळविण्याची कामगिरी केली आहे.

राजेश विश्‍वजित चौधरी या विद्यार्थ्याने अतिशय जिद्दीने अभ्यास करून मोठे यश मिळवत संपूर्ण कुटुंबाला वेगळाच आनंद मिळवून दिला आहे. सविता रमेश फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या राजेशने दहावीला 500 पैकी 481 गुण मिळवले. गणितात 100 पैकी 100 गुण मिळवतानाच त्याने विज्ञानात 99, तर सामाजिक शास्त्र विषयात 98 गुण मिळवण्याची कामगिरी केली. त्याने मराठी विषयातही 91 गुण मिळवले आहेत.
राजेश चौधरी याला या यशासाठी शाळेच्या प्राचार्या कांचन गावडे, वर्गशिक्षिका उंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेत पहिला येण्याची कामगिरी करणाऱ्या राजेशने पुढे कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन सी.ए. होण्याची जिद्द बाळगली आहे. राजेशचे वडील विश्‍वजित गेल्या 12 वर्षांपासून महेंद्र पेडावाला येथे वेटर म्हणून काम करतात. मुलाला उच्च शिक्षित करण्यासाठी ते काबाडकष्ट करीत असतात. मुलानेही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास चालवला आहे. या यशाबद्दल महेंद्र पेडावालाचे संचालक लक्ष्मीचंद जग्गड, राजूशेठ जग्गड यांच्यासह शाळेतील शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)