वेगवेगळ्या सात सर्पांच्या तस्करीत ओडिसाच्या एकाला नगरमध्ये अटक

रेल्वे पोलीस व वन विभागाची कारवाई

नगर: रेल्वेमार्गाने होणारी दुर्मिळ वन्यप्राण्यांची तस्करी रेल्वे पोलिसांनी हाणून पाडली आहे. चंद्रभान रंकामनी नाईक (वय 33, ओडिसा) या परप्रांतीयाला पोलिसांनी अटक केली आहे. नाईककडे तपासणी केल्यावर त्याच्याकडे आठ वन्यप्राणी आढळून आले आहेत. रेल्वे पोलीस आणि वनविभागाने संयुक्त कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाईक याच्याकडून रेल्वे पोलिसांनी मांडूळ, बुल्फ स्नेक सर्वसाधारण आणि ओरिएण्टल, चित्रांग नायकूल, वुल्फ स्नेक (यलो स्पोंटेड), ग्रीन लिझार्ड (सरडा), रात सर्प (स्लेंडर कोरल स्नेक), चार कबूतर आणि वेगवेगळ्या पक्षांच्या रंगाचे पंख जप्त केले आहेत. तीन लाख रुपयांचा कॅमेरा, लॅपटॉप, मोबाईल आणि वन्य जीव प्राण्यांचे पुस्तकही रेल्वे पोलिसांनी जप्त केले आहे.

पुणे रेल्वेचे सुरक्षा आयुक्त डी. विकास यांना गोपनीय माहितीद्वारे रेल्वेमार्गे दुर्मिळ वन्यप्राण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोलापूरचे सुरक्षा आयुक्त कृपाकर यांना ही माहिती देत कारवाईच्या सूचना केल्या. वन्यप्राण्यांची ही तस्करी नगरमार्गे जाणाऱ्या पुणे-हटिया रेल्वेने होणार होती. कृपाकर यांनी नगर रेल्वेचे पोलीस आर. एस. मीना यांना कारवाईच्या सूचना दिल्या. वनविभागाचे आदर्श रेड्डी यांनाही या वन्यजीवांच्या तस्करीची माहिती देण्यात आली होती. रेड्डी यांनी त्यांचे अधिकारी व कर्मचारी रेल्वे पोलिसांच्या पथकात दिले.

मीना यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलीस निधीश जोशी, आर. एस. जाट, टी. यादव, राम केकाण, सचिन आव्हाड, महेश भिसे आणि वन विभागाचे अधिकारी सचिन सहाणे, एन. व्ही. गायकवाड, सचिन शिंदे यांनी छापा घातला. रेल्वे पोलिसांनी ओडिसाचा चंद्रभान रंकामनी नाईक याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. वन विभागाने आरोपीला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)