वृद्ध आईला घराबाहेर काढणाऱ्या पुत्राला दणका : दरमहा 10 हजार रु. पोटगी देण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे- मुले शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्यास वयोवृद्ध आई-वडिलांना न्यायालयात दाद मागता येते. अशाच एका प्रकरणात वयोवृद्ध आईचा छळ करत तिला घराबाहेर काढणाऱ्या व्यावसायिक मुलाला आणि सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे. दैनंदिन गरजेसाठी पोटगी स्वरूपात आईला प्रतिमहा 10 हजार रुपये देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, मुलाने आणि सुनेने इतरांमार्फत, स्वतः वृद्ध आईला त्रास न देऊ नये, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

याचिकाकर्त्या 74 वर्षीय वृद्ध आईच्या वतीने ऍड. योगेश पवार, ऍड. हेमंत भांड आणि ऍड. अभिजीत बिराजदार यांनी काम पाहिले. त्यांनी त्रास देणाऱ्या मुलगा आणि सुनेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती.
पुण्यातील मध्यवर्ती भागातील हे कुटुंब आहे. वृद्ध महिलेला दोन विवाहित मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. या महिलेने स्वकष्टातून सदनिका खरेदी केली होती. पतीच्या निधनानंतर लहान मुलगा, पत्नी आणि नातवंडे जबरदस्तीने सदनिकेत राहत होती. असे असताना सुनेकडून आईला जेवायला न देणे, मुद्दाम सिलेंडरचे बटन सुरू ठेवून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, तर मुलाकडून शिवीगाळ करून सदनिका बळकाविण्यासाठी त्रास देणे सुरू होते. मुलाच्या आणि सुनेच्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाण्यातही तक्रार दिली होती. परंतु, मुलगा आणि सुनेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वृद्ध आईने न्यायालयात “महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण’ कायद्याअंतर्गत दैनंदिन गरजांसाठी पोटगीची मागणी केली. न्यायालयाने ऍड. योगेश पवार यांनी केलेल्या युक्तीवादनंतर वृद्ध आईला मुलाने 10 हजार पोटगी द्यावी, असा आदेश दिला आहे. तसेच मुलाला आणि सुनेला वृद्ध आईच्या सदनिकेत जाण्यापासून मज्जाव केला आहे.

What is your reaction?
22 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)