वृद्धाश्रमापेक्षा ‘लिव्ह-इन’ बरा पर्याय!

उतारवयात “लिव्ह इन’चा पर्याय वृद्धाश्रम अथवा दुसरे लग्नापेक्षा अधिक चांगला ठरतो. तरुणवयातच समाजव्यवस्थेने आखून दिलेल्या विवाहसंस्थेत रुजू होत संसारमार्गाची चव चाखलेली अनुभवी पांढरकेशी’ माणसं आपला जोडीदार गमावल्यानंतर आयुष्यात पुन्हा त्याच वळणावर आली होती. मुला-बाळांची जबाबदारी यथार्थाने पेलत, आता जबाबदारीच्या कुंपणातून बाहेर पडलेल्या “त्या’ ज्येष्ठांना स्वत:चं आयुष्य आपल्या नियमावलीनुसार जगायचं होतं. वृद्धाश्रम अथवा लग्नाऐवजी “लिव्ह इन रिलेशनशिप’चं द्वार खुलं असल्याने पुरुष वर्गाला केवळ “लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्याय पसंत पडतो. “लिव्ह इन रिलेशनशिप’ अर्थात लग्नाशिवाय स्त्री-पुरुषाने एकत्र राहणं, हा लोकप्रिय पाश्‍चिमात्य संस्कृतीचा चंगळवाद वाटल्याने महिला वर्ग मात्र चटकन हा पर्याय स्वीकारत नाहीत. आयुष्याच्या संध्याछायेच्या वयात आपला जोडीदार गमावल्यानंतर कोणा आपल्याची साथ असावी, या संकल्पनेतून जुनी पिढी नवलाईचं आयुष्य जगण्यासाठी आता लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय स्वीकारू पाहतेय.

आजकाल बहुतांश वरिष्ठ नागरिक “लिव्ह इन रिलेशनशिप’ला प्राधान्य देताना दिसतात. पुण्यात अशांचा एक क्‍लबही आहे. मात्र, आपल्या संबंधांना समाजमान्यता मिळावी, यासाठी स्त्रियांची लग्नाची मागणी जोडीदाराच्या आडमुठया भूमिकेमुळे दबली जाते, हेही लक्षात घ्यायला हवं. या सगळ्यात आम्हाला सुरक्षा प्राप्त होईल का, असा प्रश्न महिलांच्या मनात अखेरपर्यंत असतोच. त्यामुळे “लिव्ह इन रिलेशनशिप’ स्त्रियांसाठी सोपी नसल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे या पर्यायाला आता पुरुष ज्येष्ठांनी स्वीकारलं आहे, असं ग्राह्य धरावं लागेल.

मुलांची संसाराची गाडी मार्गी लावत, आयुष्यभर त्यांच्या सुखसोयींचा विचार केला. आता आम्ही सर्व जबाबदारीतून मुक्त आहोत. नातवंडांना खेळवायचं वय असलं तरीही मनाच्या कोपऱ्यात जोडीदाराची सल राहते. पुन्हा कोणाची साथ मिळावी, ही आशा बाळगणं गैर नाही,’ हा सूर अनेक वयोवृद्ध आळवताना दिसतात. आयुष्य आमचं आहे, घरच्यांच्या मताला इथे कवडीमोल किंमत नाही, असा नवमतवाद’ ते मांडतात. पण एरवी तरुणाईच्या या ट्रेण्डला आत्मसात करताना आपण पाश्‍चिमात्य विचारसरणीचा पुरस्कार करत नसल्याची स्पष्टोक्ती व्यक्त होते. एकमेकांसोबत उतारवयाचं आयुष्य घालवायची वचनं देण्याअगोदर थोडा काळ एकमेकांसोबत घालवणं योग्य. त्यासाठी आधी मनसोक्त गप्पाटप्पांचं आयोजन करू, अशी भावना ही मंडळी व्यक्त करत होती.

एकाकी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पुनर्विवाह आणि त्यात पुन्हा एकमेकांशी पटलं नाही म्हणून विभक्त होणं अवघड जात असल्याने त्यापेक्षा “लिव्ह इन रिलेशनशिप’ पर्यायाने योग्य समजली जात आहे. याच धर्तीवर आज अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून ज्येष्ठांसाठी हा पर्याय राबविला जातोय. थोडक्‍यात, वृद्धांमधील “लिव्ह इन रिलेशनशिप’ ही काळाची गरज असली तरी संस्कृतीचा पगडा असलेल्या आपल्या समाजात अशा प्रकारचं सहजीवन स्वीकारायला वेळ लागणार. या नात्याला पूर्वग्रहाने पाहण्यापेक्षा एकमेकांच्या सहवासात विरघळणाऱ्या ज्येष्ठांची गरज समजून घ्यावी. आप्तांनी या नात्याला खुलेपणाने स्वीकारलं तर समाजाचीदेखील मान्यता मिळेल. दुर्दैवाने तसं घडलं नाही, तर ज्येष्ठांनी स्वबळावर पाऊल उचलून ही “सेकंड इनिंग’ गोड करावी, अशीच अपेक्षा आढळते.

ज्येष्ठांच्या लिव्ह इनचा पुरस्कार करताना ते अलैंगिक असल्याचं समर्थन केलं जातं. तरुणांच्या “लिव्ह इन’मध्ये पुरुष आणि स्त्रीमधल्या वयाची तफावत ही गोष्ट महत्त्वाची ठरते. मात्र, ज्येष्ठांच्या बाबतीत अशी अट असू नये, अशी अपेक्षा असते. मात्र, तरीही पुरुष ज्येष्ठांना लिव्ह इन’साठी आपल्यापेक्षा तरुणच स्त्री हवी असल्याचं लक्षात आलं. साठीच्या ज्येष्ठाने सत्तरीच्या स्त्रीला “लिव्ह इन’साठी आवतण देताना दिसत नाहीत.

– मानसी शर्मा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)