वृद्धांसोबत सहजच केलेली ट्रिप

मला जवळच्या वयस्क लोकांना माझ्या गाडीत फिरवून आणायला आवडते. ते अर्थातच मीच निवडते. नाहीतर आपला नुसताच ड्रायव्हर होतो. ह्या वयस्क लोकांत बरेच श्रद्धाळू असतात. वयोमानानुसार, आजारपणांनुसार ते इतरांना नकोसे होतील इतकेही धार्मिक नाहीत. कोणाला त्यांच्या पूजा पाठाने घरात त्रास देतील असेही धार्मिक नाहीत. पण देवाच्या दाराशी आलोय तर पायऱ्या चढून गेले पाहिजे, दर्शन घेतले पाहिजे, तसे चढणे आपल्याला आजारपणांमध्ये झेपले पाहिजे, असे मानणारे आहेत.

ह्या आवडत्या लोकांपैकी कोणी मला म्हणाले, पैठणला घेऊन चल ना प्राची. तर मी वाट अजून थोडी मोठी करून आळंदी पण करून आणते त्यांचे. मग ते म्हणतात, प्राची देव मानत नाही, पण आम्हांला सगळ्या देवस्थानी नेऊन किती पुण्य कमावते. आम्हांला घरातून बाहेर काढते. जपून नेते. काळजीने परत आणते. ते पुण्य काही माझ्या गाठी जमा झालेले आणि त्यामुळे माझ्या यशात/ संपत्तीत चार चॉंद लागलेले मला तरी दिसले नाहीत कधी. पण ते मनापासून आशीर्वाद मात्र देतात. सोबत छान वेळ जातो. त्यांचे विश्व समजते. त्यांची असलेली, नसलेली मुले, त्या-त्या नात्यांमधल्या मेख जवळून कळतात.

एकदा असेच चौघांना नेले. त्यातले तिघे चालू शकत होते. एक आजी नुकत्याच बऱ्या होत होत्या आजारपणातून. समोर खूप पायऱ्या होत्या. त्यांना चढणे शक्‍य नव्हते. पार्किंग देखील खूप दूर होते. तिथून पाऊण किलोमीटर पायी जावे लागणार होते. मग पायऱ्या चढून देव दिसला असता. इतर वयस्क तिघे हळूहळू चालू पडले. ह्या आजींसोबत मी जरावेळ थांबले. तसा सुरक्षित भाग होता. त्यांना गाडीची काच उघडून दिली. इतर दारे पॅक केली. गाडीच्या चाकाला मागे मोठा दगड लावला. चावी त्यांच्या हातात दिली. त्याही म्हणाल्या, तू जाऊन ये. तुला काय फोटो काढायचे असतील वगैरे.

मी कॅमेरा घेऊन निघाले. तिथे मस्त स्पॉट्‌स होते फोटोसाठी. ते करत करत त्या तिघांच्या दिशेने गेले. तिघे हळूहळू पायऱ्या चढले. वर बरेच चालत गेले. टेकले. पाणी प्यायले. तिथे जवळपास एक तास गेला. मी टेकडीवरून गाडी बघितली. सगळे ठीक होते. फोटो काढून इतर तिघांना घेऊन चला निघू म्हणाले. ते पायऱ्या उतरायला लागणार होते. मी खाली उतरले होते. तितक्‍यात त्या आजी कोणाच्या तरी ऍक्‍टिव्हावर टेकडीच्या पायथ्याशी आल्या. मी अवाक. माझ्या गाडीचे काय? चावी कुठेय? हा मुलगा कोण? त्या मुलाने अगदी जपून आजींना गाडीवरून उतरवले. आजींची पर्स आणि गाडीत ठेवलेली माझी सॅक मला नीट हातात दिली. ताई, तुमची गाडी मी नीट लॉक केली आहे. काळजी करू नका म्हणाला. आजींनी सहज त्याला विचारले, मला पायथ्याशी नेतो का, म्हणून घेऊन आलो. आजींच्या हाताला मेडिकल टेप लावलेल्या आहेत. त्या हॉस्पिटलमधून इथे आल्या आहेत, ते लक्षात आले ते पाहून.

आजी त्याला खूप आशीर्वाद देत होत्या. मी लगेच सावध झाले. म्हणाले, तुम्हांला यांना परत सोडावे लागेल गाडीपर्यंत. तो हो म्हणाला. दर्शन घेऊन आला. आजी पायथ्याशी बसल्या. मग औदुंबरला फेऱ्या मारल्या. तोवर इतर तिघे खाली आले. सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी होते. त्या मुलाला त्यांनी आशीर्वाद दिले. आजी “अंत नको पाहू’ आरती म्हणत होत्या पायरीवर बसून. इतर तिन्ही वृद्ध रडवेले झाले होते. हा मुलगा पण रडवेला झाला. मला म्हणाला, माझी आई असती, तर घेऊनच आलो असतो ना.

मी सगळ्यांना शांत केले. पाणी दिले. त्या मुलाने आजीला परत गाडीवर माझ्या गाडीपर्यंत सोडले. इतर आले हळूहळू. मस्त पार्टी केली छोटी. झकास ट्रिप झाली.

अनोळखी लोकांना टचकन डोळ्यांत पाणी आणेल, माणसाला माणसाशी निस्वार्थपणे चटकन जोडेल, मन रमविण्यासाठी काहीतरी एखादी कृती लोक एकटे अथवा एकत्र येऊन करतील. जी सहजच करता येईल, असू तिथे करता येईल, फार खर्च नसेल, एकमेकांना आधार मिळेल. अशी कोणती ऍक्‍टिव्हिटी, काम नास्तिक लोकांनी केलेले आहे? हे मी उद्धटपणे विचारत नाहीये. हे मलाच विचारते आहे. मी देवाला नमस्कार करेल की नाही मला माहीत नाही. पण मानसशास्त्राची अभ्यासक म्हणून आस्तिक माणसे मला समजून घ्यावीशी वाटतात. त्यातल्या कट्टर लोकांना मी सहन करणार नाही. पण असे अधलेमधले पण खूप असतात.

मी देव मानत नाही, तरी ते माझ्या सोबत येतात. मला प्रेम देतात. माझे देव न मानणे समजून घेतात. कोणत्याही विचारधारा असल्या तरी प्रेम सगळ्यांवर मात करते. प्रेम असेल, तरच दुसऱ्या विचारसरणीवाल्याला विरुद्ध विचारसरणीवाला थोडी स्पेस देतो. श्‍वास घेऊ देतो. किती दृष्टांत झाले आहेत मला.

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)