वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना देणार पैसे

शासनाकडून “अॅग्रो फॉरेस्ट्री’ योजनेंतर्गत वन महोत्सव

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांनी वृक्ष लागवड करावी यासाठी राज्य शासन पैसे देणार आहे. शासनाच्या “अॅग्रो फॉरेस्ट्री’ या विशेष योजनेंतर्गत वन महोत्सवासाठी वृक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागातर्फे देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वन महोत्सवांतर्गत केल्या जाणाऱ्या वृक्षारोपणात आगामी वर्षात शेतकऱ्यांसाठी “अॅग्रो फॉरेस्ट्री’ ही विशेष योजना राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत राज्यातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वृक्ष लागवड आणि त्यासंदर्भातील इतर कामांसाठी आर्थिक मदतही केली जाणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षांपासून वन महोत्सवाचे आयोजन केले जाते. 1 ते 31 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत महोत्सवांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. राज्यात आतापर्यंत 2 कोटी (2016), 4 कोटी (2017) आणि 13 कोटी (2018) वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आगामी वर्षात म्हणजेच जुलै 2019 मध्ये या मोहिमेअंतर्गत 33 कोटी वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट राज्याच्या महसूल व वन मंत्रालयातर्फे निश्‍चित केले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, आगामी वर्षासाठी काही नवीन योजना लागू करत जास्तीत जास्त नागरिकांना या मोहिमेसोबत जोडण्याचा प्रयत्न वन विभागातर्फे केला जात आहे.

सामग्रीचा खर्च वन विभाग करणार
“अॅग्रो फॉरेस्ट्री’ योजना ही याच प्रयत्नांतील एक भाग आहे. या योजनेंतर्गत छोट्या शेतकऱ्यांसाठी वृक्षारोपणासाठी विशेष मदत दिली जाणार आहे. यामध्ये वृक्ष खरेदी, वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे, त्यासाठी लागणारी सामग्री यांचा खर्च वन विभागातर्फे केला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेत नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)