वृक्ष प्राधिकरण समितीमधील नवीन सदस्यांच्या नियुक्‍त्या अडचणीत

अशासकीय सदस्यांची माहिती एनजीटीच्या सुनावणीत दिलीच नाही ?
पुणे  : महापालिकेच्या वृक्ष प्राधीकरणावर नुकतेच नियुक्त करण्यात आलेल्या 7 अशासकीय पदांवरील कार्यकर्त्यांपैकी किमान 4 सदस्य अपात्र ठरण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. वृक्ष प्राधीकरणासंदर्भात हरित लवादामध्ये (एनजीटी) सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान महापलिका प्रशासनाने या नवनियुक्त सदस्यांची नावे लवादाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. मात्र, ही माहितीच एनजीटीच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या सात सदस्यांमध्ये 4 सदस्य नियमानुसार, शास्त्रशाखेचे पदवीधर नसल्यानेच ही माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापलिकेच्या वृक्ष प्रधीकरण समितीवर गुरूवारी (दि. 10) सात अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सदस्यांचा समावेश आहे. वृक्ष प्राधीकरणासंदर्भात हरित लवादाकडे सुनावणी सुरू असून अशासकिय सदस्य नियुक्तीबाबत लवादाला कळविणे गरजेचे होते. परंतू लवादामध्ये शुक्रवारी (दि. 11)सुनावणी असतानाही या सदस्यांची नावे लवादाच्या निदर्शनास आणून दिली गेली नाहीत. यासंदर्भात महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, वृक्ष प्राधीकरणावर नियुक्त करण्यात आलेल्या 7 पैकी 4 सदस्य हे शास्त्र शाखेचे पदवीधर नाहीत. यापैकी तीन हे कला शाखेचे पदवीधर असून एक जण सातवी उत्तीर्ण आहे. मुळात या पदावर नियुक्तीसाठी सदस्य शास्त्र शाखेचा पदवीधर असणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ राजकिय कार्यकर्त्यांचे पुर्नवसन व्हावे, म्हणूनच वृक्ष प्राधीकरण समितीकडे पाहीले जात असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने त्यांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. सदस्य नियुक्तीबाबत निकष पाळले गेले नाहीत, हे एनजीटीच्या निदर्शनास आल्यास न्यायालयाच्या रोषास सामोरे जावे लागेल, या धास्तीनेच त्यांनी अशासकीय सदस्यांची नावे निदर्शनास आणून देण्याचे टाळले असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)