वृक्ष छाटणीसाठी लागणार नगरसेवकांची शिफारस

पिंपरी – शहराच्या विविध भागांमध्ये धोकादायक झालेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावयाची असल्यास अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक नगरसेवकांची शिफारस असणे आवश्‍यक असणार आहे. फांद्या छाटणीच्या कार्यवाहीनंतर वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत या कामाला कार्योत्तर मान्यता दिली जाणार आहे.

वृक्ष प्राधिकरणाच्या सोमवारी (दि. 19) झालेल्या सभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सदस्य शितल शिंदे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका हद्दीतील वृक्ष छाटणीवर महिनाभरापूर्वी झालेल्या सभेत वादळी चर्चा झाली होती. त्यावेळी सदस्य विलास मडिगेरी यांनी इंद्रायणीनगर मधील बेकायदा वृक्ष छाटणीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर बेकायदेशीरपणे होणाऱ्या वृक्षतोडीकरिता संबंधित ठेकेदाराला दोषी धरून, त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील बेकायदा वृक्षतोडीला आळा बसेल, हा या मागील हेतू होता. तसेच, या फांद्या छाटणीला वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले होते.

-Ads-

दरम्यान, शहराच्या विविध भागांमध्ये अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांच्या फांद्या तत्काळ तोडणे आवश्‍यक असल्याची बाब या सभेत काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. तत्काळ फांद्या छाटण्याची गरज भासल्यास तो प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत मंजूर होण्यास बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे तत्काळ फांद्या छाटण्यासाठी स्थानिक नगरसेवकाचे शिफारस पत्र असणे आवश्‍यक आहे. या फांद्या छाटणीनंतर या कामाला कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव या सभेत मंजूर करण्यात आला आहे.

नारळांच्या झाडांचे पुनर्रोपण करणार
शहराच्या विविध भागांत प्रामुख्याने खासगी जागेत नारळाची झाडे आहेत. मात्र, या झाडांच्या फांद्या व अन्य बाबींमुळे निर्माण होणारा कचरा व झाडांच्या वाढीमुळे अनेक भागातील ही झाडांबाबत अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त होत आहेत. त्यामुळे ही झाडे सरसकट मुळापासून न तोडता त्याचे महापालिकेची उद्याने व अन्य जागांवर पुनर्रोपण करण्याची चाचपणी करण्याच्या सूचना उद्यान विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर या बाबीची चाचपणी केली जाणार आहे. ही चाचपणी यशस्वी झाल्यास शहरातील अनेक नारळाच्या झाडांना जीवदान मिळणार आहे.

फांद्या छाटणीसाठी होणार रेखांकन
शहरातील विविध ठिकाणच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी घेत, बहुतांशी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. ही बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समिती अथवा अपवादात्मक परिस्थितीत तत्काळ झाडाच्या फांद्या छाटावयाच्या असल्यास, त्या झाडाच्या फांद्यांवर खूण करुन, तेवढ्याच आकाराची फांदी छाटण्याचे रेखांकन केले जाणार आहे. त्यापुढील फांद्या छाटल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच फांद्या छाटण्यापूर्वी व फांद्या छाटल्यानंतरचे फोटो सादर करणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)