वृक्षांच्या पुनर्रोपणात मेट्रोला 92 टक्‍के यश

पिंपरी – मेट्रो पर्यावरणपूरक असे घोषवाक्‍य असलेल्या महाराष्ट्र मेट्रोचे काम सध्या जोरात सुरू आहे. पर्यावरणपूरक हा शब्द सार्थ ठरवण्यासाठी मेट्रोचा हॉर्टीकल्चर विभाग कसून प्रयत्न करताना दिसत आहे. मेट्रोचा विकास प्रकल्प राबवण्यासाठी सुमारे 419 झाडे अडथळा ठरत आहेत. त्यापैकी 206 झाडांचे मेट्रोच्या वतीने पुनर्रोपण करण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आलेल्या या पुनर्रोपणात मेट्रोला 92 टक्‍के यश मिळाले आहे. अर्थात पुनर्रोपित करण्यात आलेल्या एकूण वृक्षांपैकी 92 वृक्ष जिवंत आहेत आणि त्यांना नवी पालवी फुटू लागली आहे.

उल्लेखनीय बाब अशी की, मेट्रोच्या हॉर्टीकल्चर विभागाने अतिशय क्‍लिष्ट, वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया असतानाही वृक्षांना वाचवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. एक-एका वृक्षाचा, मातीचा अभ्यास करुन अत्याधुनिक यंत्रणा वापरत झाडे वाचवण्यात आली आहेत. हॉर्टीकल्चर विभागाचे उपमहाव्यवस्थापक बी. जी. माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोमध्ये 65 टक्के सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच पुणे मेट्रोला आणखी पर्यावरणपूरक बनविण्यासाठी मेट्रो खांबांवर व्हर्टिकल गार्डन, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण असे मार्ग अवलंबिण्यात येत आहेत. मागील वर्षी महामेट्रोकडून सुमारे तीन हजार झाडे लावण्यात आली. सर्व झाडे चांगल्या स्थितीत तग धरून वाढीला लागली आहे. तसेच यावर्षी जून महिन्यापर्यंत सुमारे तीन हजार झाडे लावण्यात आली असून वर्षअखेर पर्यंत आणखी तीन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण सुमारे 10 हजार पेक्षा जास्त झाडे दोन वर्षांमध्ये लावण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेट्रोमार्गास अडथळा ठरणा-या झाडांमध्ये प्रामुख्याने बदाम, मोहगनी, पिवळा गुलमोहर, पिंपळ, गुलमोहर, पार्किया आदी प्रमुख झाडे आहेत. 419 झाडांपैकी 206 झाडे पुनर्रोपित करण्यात आली आहेत. उर्वरीत झाडे जशी गरज पडेल तशी पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत पिंपरी मधील गुलाब पुष्प वाटिका मध्ये 68, कासारवाडी येथील मैल जलशुद्धीकरण प्रकल्पात 130 आणि वल्लभनगर बस आगार परिसरात 08 झाडांचे पुनर्रोपण केले आहे.

झाडांची काळजी घेणे गरजेचे
मेट्रोच्या वतीने झाडांचे पुनर्रोपण करत असताना कित्येक झाडांच्या खाली पाईप लाईन्स, सर्व्हिस लाईन्स गेल्या होता. कित्येक ठिकाणी राडा-रोडा टाकून झाडांच्या मुळाला पोहचणारे पाणी अडवण्यात आले होते, तर कित्येक झाडांच्या बुंध्याला सिमेंट कॉंक्रीट होते. अशा झाडांना काढून पुनर्रोपित करणे खूपच अवघड होते. यामुळे काही झाडांचे आरोग्यही बिघडले होते. परंतु मेट्रोच्या हॉर्टीकल्चर विभागाने हे आव्हान व्यवस्थितरित्या पेलले. पालिकेने रस्त्याच्या कडेला लहान झाडे लावणे अपेक्षित होते. मोठ्या वृक्षांची मुळे खोलवर जातात. खालून वेगवेगळ्या प्रकारच्या पाईपलाईन्स जात असताना, राडा-रोडा असताना त्यावर झाडे लावण्यात आली. डिवाईडर, रस्त्याचे काम होत असताना सिमेंटमुळे झाडांचा श्‍वास गुदमरतो आहे का याकडे लक्षही देण्यात आले नाही. पुनर्रोपण केल्यामुळे ही झाडे वाचली. निर्माण झालेल्या या अडथळ्यांमुळे मेट्रोला खोलवर खड्डे खंदून रुट बॉल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)