वृक्षलागवड मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी : 13 कोटींच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक
नगर – येत्या पावसाळ्यात आपल्या जिल्ह्याला मिळालेले 49 लाख 94 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्‍चितपणे साध्य होईल. त्यासाठी नियोजनाप्रमाणे प्रत्येक यंत्रणांनी आताच कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा द्विवेदी यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, वन विभागाचे उप महावनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भोसले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम यांच्यासह कृषी, शिक्षण, पाटबंधारे यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात वनआच्छादन वाढवण्यासाठी वनविभाग, ग्रामपंचायत, इतर शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था आणि लोकसहभागातून तीन वर्षात एकूण 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 2017 मध्ये पावसाळ्यात 4 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्‌य होते. 2018 च्या पावसाळ्यात 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यासाठी 49 लाख 94 हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, दि. 1 ते 31 जुलैदरम्यान आपल्याला संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवावयाची आहे. त्यासाठी प्रत्येक यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागावे. सध्या जिल्ह्यात 43 लाख 6 हजार इतके खड्डे तयार आहेत, उर्वरित खड्डे खोदण्याचे काम संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावे. हा कार्यक्रम प्रभावीरीत्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व यंत्रणा, उपलब्ध क्षेत्राची माहिती, सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वनविभाग आणि जिल्हा परिषद या मोठ्या यंत्रणा आहेत. ग्रामपंचायत पातळीवर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी या दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करुन रोपे वेळेत संबंधितांपर्यंत पोहोचतील, हे पाहावे, अशा सूचना दिल्या.
जिल्हा हरित जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग या मोहिमेत असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन द्विवेदी यांनी केले.
उपमहावनसंरक्षक रेड्डी यांनी वृक्षलागवड मोहिमेसंदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. वन विभागामार्फत 54 रोपवाटिकेत 53 लाख 60 हजार आणि कृषी विभागामार्फत 5 रोपवाटिकेत 2 लाख रोपांची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे वितरण करण्याचे नियोजन तालुका व रोपवाटिकानिहाय करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रीन आर्मीच्या सदस्यांचा सहभाग
वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग असावा, यासाठी विविध संस्था-संघटना आणि नागरी संस्थांशी संपर्क करण्यात येत असून, त्यांना यात सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील 2 लाख 13 हजार 571 हरित सेनेचे सदस्य सहभाग घेणार असल्याचे उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)