वीस गुंठ्यातील टोमॅटो पिकाने केले लालेलाल

पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यातील जारकरवाडी येथील उपसरपंच शरद विठ्ठल भोजणे यांनी आपल्या तांबट, मुरमाड शेतजमिनीतील 20 गुंठे क्षेत्रामध्ये खराब हवामानातही टोमॅटोची बाग फुलवून चार लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला.
शरद भोजणे यांनी आपल्या 20 गुंठे मुरमाड शेतजमिनीत टोमॅटोचे पिक घेण्याचे ठरविले. शेतातील ज्वारीचे पिक काढून नांगरणी केली. जमिनीत शेणखत टाकले. ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने रोटारुन जमीन भुसभुशीत केली आणि 5 फुटाच्या अंतरावर बेड वाफे काढले. त्यामध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर करुन 2182 जातीच्या टोमॅटो रोपांची लागवड केली.
टोमॅटोच्या रोपाची वाढ झाल्यावर या पिकावर करपा व आळीचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून एन्ट्राकॉंल, ग्रीनटच, प्रोप्रक्‍ससुपर या औषधांची फवारणी करण्यात आली. टोमॅटोची वाढ जोमात सुरु होती. त्यानंतर बांधणी करण्यात आली. त्या दरम्यानच्या काळात वातावरणात बदल होत गेल्याने टोमॅटो पिकावर करपा, आकाई, मावा, तुडतुडे, प्रादुर्भाव होऊ लागल्याने अटलांन्स, रोको, अंगार या औषधांची फवारणी करुन ठिबक सिंचनामधून रासायनिक खते आणि मायक्रो न्यूटन, कॅल्शियम नायट्रेड देण्यात आली. यामुळे टोमॅटोची जोमदार वाढ झाली आणि टोमॅटो फळही झाडांना येऊ लागले.
दोन महिन्यानंतर टोमॅटो तोडणीला सुरुवात झाली. नारायणगाव येथे टोमॅटो विक्रीसाठी पाठवण्यात आली. सुरुवातीला 20 किलोस (एका कॅरेटला) एक हजार रुपये बाजारभाव मिळाला. त्यानंतर 700 ते 800 रुपये बाजारभाव मिळाला. या टोमॅटो पिकासाठी खते, औषधे, मजुरी असे मिळून 40 हजार रुपये खर्च आला. तर चार लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला. या टोमॅटो पिकाला कुषीसेवा केंद्राचे पार्थ ढोबळे व सतिश कुटे यांनी खते, औषधे देण्याचे नियोजन आणि मार्गदर्शन केले, असे शरद भोजणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)