वीरपत्नींना महाराष्ट्र दिनापासून मोफत एसटी प्रवास

धुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत भारतीय सैन्यातील, सुरक्षा दलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. या सवलत योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी म्हणजेच उद्यापासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते सवलत कार्ड देऊन होणार आहे.

वीरपत्नींना देण्यात येणाऱ्या कार्डवर एका बाजूला शहीद झालेल्या जवानाचा फोटो, नाव, हुद्दा, पत्ता आहे, दुसऱ्या बाजूला वीरपत्नीचा फोटो, सवलत पास क्रमांक, नाव, पत्ता, रक्तगटाचा उल्लेख असेल. राज्यातील 517 वीरपत्नींना उद्या हे सवलत कार्ड देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना उपस्थित राहता यावं यासाठी एसटी प्रशासनाने विशेष सोय देखील केली असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

एसटी प्रशासनाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे काही वीरपत्नींनी ही सवलत योजना स्वतःची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन स्वतःहून नाकारली आहे. शहीद जवानांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसटी महामंडळ या शहीद सन्मान योजनेची सुरुवात करुन थांबलं नाही, तर यापुढे शहीद जवानाच्या पाल्याला अथवा वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट एसटीच्या नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)