वीरधवल खाडे आठव्या स्थानी 

जकार्ता: वीरधवल खाडे आणि श्रीहरी नटराज या भारतीय जलतरणपटूंनी प्राथमिक फेरीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद करताना येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेतील अनुक्रमे पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय आणि पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारांत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र वीरधवलला 24.48 सेकंद वेळेमुळे आठव्या क्रमांकावर समाधना मानावे लागले.
त्याआधी वीरधवलने पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय प्रकारातील दुसऱ्या हीटमध्ये 24.09 सेकंद अशी वेळ देताना एकूण पाचव्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली होती. वीरधवलने 24.14 सेकंदांचा आपलाच विक्रम मोडीत काढला. वीरधवलने चीनमध्ये झालेल्या 2009 आशियाई जलतरण स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. परंतु अंतिम पेरीत त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
वीरधवलचा या स्पर्धेतील हा दुसरा राष्ट्रीय विक्रम ठरला. वीरधवलने याआधी पुरुषांच्या 50 मीटर फ्रीस्टाईलमध्येही नव्या राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठली होती. परंतु अंतिम फेरीत त्याचे कांस्यपदक केवळ एक शतांश सेकंदाने हुकले होते. त्यामुळे आता 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीच्या अंतिम फेरीतील वीरधवलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे.
नटराज श्रीहरीने पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारांत दोन मिनिटे 02.97 सेकंद अशा नव्या राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. श्रीहरीने स्वत:चाच दोन मिनिटे 03.17 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. नटराजने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत दोन मिनिटे 04.75 सेकंद अशी वेळ दिली होती. दरम्यान पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीत भारताच्या अंशुल कोठारीचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. अंशुलने 25.45 सेकंद वेळ देणाऱ्या अंशुलची 28व्या क्रमांकावर घसरगुंडी झाली.
तसेच पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये वीरधवल खाडेने निराशा केली. प्राथमिक फेरीत 59.11 सेकंद अशा खराब कामगिरीमुळे वीरधवल 43व्या क्रमांकावर फेकला गेला. त्याचप्रमाणे भारताच्या ऍरॉन डिसूझाने याच प्रकारांत 51.50 सेकंद अशी प्रशंसनीय वेळ दिली. तरीही तो 27व्या क्रमांकावर फेकला गेला. पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत भारताच्या अद्वैत पागेचे आव्हान संपुष्टात आले. प्राथमिक फेरीत दोन मिनिटे 06.85 सेकंद वेळ देणारा अद्वैत 12व्या क्रमांकावर घसरला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)