वीज उद्योगातील कामगारांचा एल्गार

– 32 हजार कंत्राटी कामगारांचे 22 मे पासून आंदोलन
पुणे  (प्रतिनिधी) – राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढलेला असतानाच ऐन उन्हाळ्यात वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील सुमारे 32 हजार कंत्राटी कामगार रोजंदारी कामगार पध्दतीच्या मागणीसाठी बेमुदत काम बंद करणार आहेत. 22 मेपासून हे आंदोलन सुरू होणार आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या तिसऱ्या अधिवेशनात कंत्राटी कामगार कायम होईपर्यंत पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पध्दती पुन्हा राबवावी, याबाबतचा ठराव झाला होता. यावर निर्णय घेत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन प्रधान ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वीज उद्योगातील काही प्रमुख संघटना प्रतिनिधी यांची समिती स्थापन केली होती. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक मनोज रानडे यांनी या बाबतचा सकारात्मक अहवाल उर्जाखात्याकडे दिला आहे. रानडे समिती मधील सर्व सदस्यांचे रोजंदारी कामगार पध्दतीवर एकमत झाले आहे. मात्र, शासनाकडून आर्थिक बोजाचे कारण देत या बाबत टाळाटाळ होताना दिसत आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. सुमारे 32 कंत्राटी कामगारांच्या मनात असंतोषाचे वातावरण आहे. मनोज रानडे समितीचे ज्येष्ठ सदस्य मोहन शर्मा, अण्णाजी देसाई यांनी 22 मेपासून काम बंद आंदोलन करण्याचे मुंबई येथे ठरविले आहे. त्यानुसार शासन व कंपनीस तशी कृती समिती मार्फत नोटीस आपण प्रशासनास दिली होती. या संदर्भात कंपनी प्रशासन व आंदोलन कर्ते यांची 19 मे रोजी महत्वाची बैठक प्रकाशगड मुंबई येथे झाली. या बैठकीसाठी मोहन शर्मा, अण्णाजी देसाई, शरद संत, आर. टी. देवकर दिलीप कोठारे,वामन बुटले, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे निलेश खरात, उमेश आनेराव, सागर पवार, कृष्णा भोयर, नचिकेत मोरे, इत्यादी उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे 22 मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचे कृती समितीने ठरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)