वीजबिलातील पत्त्याची दुरुस्ती आता एसएमएसद्वारे

पुणे – वीजबिलातील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्ती आता घरबसल्या एसएमएसद्वारे करता येणार आहे. या सुविधेमुळे पत्यामधील बदलासाठी आता महावितरणच्या कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही. मागील दोन दिवसात राज्यातील सुमारे 52 हजार ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या वतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी सातत्याने नवनवीन उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणच्या वीजबिलावरील ग्राहकाच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्या वतीने अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत असून त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणार आहे.

महावितरणच्या ज्या ग्राहकांनी आपला अधिकृत मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविला आहे. अशा ग्राहकांना महावितरणच्या वतीने एसएमएस पाठविण्यात येत आहे. या एसएमएस वरील लिंक ओपन केल्यास त्यावर ग्राहकाचा पत्ता उपलब्ध असणार आहे. त्या पत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा सदर लिंकद्वारे ग्राहकांना देण्यात आली आहे. यात ग्राहकांना कुठलाही आर्थिक भार सोसावा लागणार नाही.

वीजबिलावरील पत्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहकांना वेळेत बिल मिळणे, योग्य वेळेत रिडिंग करणे या प्रक्रियेत अधिक अचूकता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही वेळेत वीजबिल भरुन महावितरणच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. राज्यात महावितरणचे सुमारे 2 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी 1 कोटी 95 लाख ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईलची नोंदणी महावितरणकडे केली आहे. मोबाईलवरील एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी. असेही आवाहन महावितरणने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)