प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे
बारामती- सोलापूर, सातारा जिल्ह्यासह बारामती मंडल मधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी वाढत असून ही अतिशय गंभीर बाब आहे व ती सहन केली जाणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर करावी, असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले.
बारामती येथील “ऊर्जाभवन’ मध्ये गुरुवारी (दि. 6) आयोजित बारामती परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर, पुनम रोकडे, शंकर तायडे, भाऊसाहेब इवरे, वादिराज जहागिरदार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) एकनाथ चव्हाण आदींसह परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंता, उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ताकसांडे म्हणाले की, प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या चालू महिन्याच्या वीजबिलांसोबतच मागील थकीत वीजबिलांची 100 टक्के वसुली करण्यासाठी सुरु असलेली मोहीम आणखी कठोरपणे राबविणे आवश्यक आहे. कंत्राटदारांच्या मीटर रिडींग घेण्याच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना दरमहा 5 टक्के रिडींग घेण्याचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे या कामाची चोखपणे अंमलबजावणी करण्यात यावी. वीजग्राहकांना अचूक व योग्य रिडींगचे वीजबिल देण्यासाठी सतर्क राहावे तसेच यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण व दुरुस्ती कामांचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
बारामती परिमंडल अंतर्गत सातारा, सोलापूर जिल्ह्यासह बारामती मंडलमध्ये नवीन वीज जोडण्यांसाठी मीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील पेडपेडींग असणाऱ्या ग्राहकांना ताबडतोब नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी यावेळी दिले. सध्या 92 टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली आहे. डिसेंबर महिन्याअखेर संपूर्ण वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा